मुंबई । इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलने जागतिक क्रिकेटला अनेक स्टार खेळाडू दिले. काही खेळाडूंनी आयपीएलमध्ये आपल्या प्रतिभेची झलक दाखवत राष्ट्रीय संघात दमदार एंट्री केली. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, शॉन मार्श, डेव्हिड मिलर यांनी आयपीएलमध्ये पैसा वसूल कामगिरी केली. पण असेही काही खेळाडू आहेत जे एका रात्रीचे तारे होऊन नंतर निखळून पडले. सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव आणि फिटनेसमुळे राष्ट्रीय स्तरावर त्यांना संधी मिळाली नाही. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे राजस्थान रॉयल संघाचा कामरान खान.
शेन वॉर्नने शोधून काढलेल्या या हिऱ्याची क्रिकेटमधली कारकीर्द वयाच्या 23 व्या वर्षीच संपली. आज कामरान खान शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतोय. त्याने पहिल्या आयपीएलच्या मोसमामध्ये वेग आणि अचूक यॉर्करने शेन वॉर्नसारख्या गोलंदाजाला प्रभावित केले होते. मात्र, गोलंदाजीतला हा ‘रिदम’ त्याला दीर्घकाळ टिकवून ठेवता आला नाही.
उत्तर प्रदेशमधील महू येथील राहणारा कामरान हा एका लाकूडतोड्याचा मुलगा आहे. एकेकाळी गरिबीमुळे त्यांना दोन वेळचे जेवण देखील मिळणे मुश्किल व्हायचे. अशा परिस्थितीत त्याने क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहिले होते. यासाठी त्याने मुंबईचा रस्ता पकडला. प्रत्येक दिवस प्लॅटफॉर्मवर राहून दिवस काढले. याच दरम्यान, त्याला मुंबईतल्या पोलिस क्लबकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याने पहिल्या सामन्यात भेदक गोलंदाजी करत चार गडी बाद केले.
प्रतिभाशाली खेळाडू असलेल्या कामरानवर राजस्थान रॉयल्सचे कोचिंग डायरेक्टर डॅरेन बॅरी यांची नजर पडली. बॅरी यांनी कामरानला शेन वॉर्नकडे घेऊन आले. कमी उंची असलेल्या कामरानला 140 किलोमीटर वेगाने चेंडू फेकताना पाहून शेन वॉर्न देखील अचंबित झाला. राजस्थान रॉयल्सने त्याला करार करून आपल्या संघात सामील करून घेतले. 2011 मध्ये त्याला पुणे वॉरियर्स संघाने आपल्या संघात संधी दिली. वाढत्या स्पर्धेत त्याला क्रिकेटमध्ये जम बसवता आला नसल्याने कोणत्याच आयपीएलच्या संघाने नंतर त्याला खरेदी केले नाही.
काही वर्षांपूर्वी त्याला उत्तर प्रदेशच्या संघाकडून 2 प्रथम श्रेणीचे सामने आणि 11 टी 20 सामने खेळण्याची संधी देखील मिळाली पण पुढे संधी मिळाली नाही. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, कामरान आज उत्तर प्रदेशामध्ये शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. यासोबत तो टेनिस बॉल क्रिकेट देखील खेळतो.
आयपीएलमधील पहिली सुपर ओव्हर फेकण्याचा मान
कामराने आयपीएलमध्ये एकूण 9 सामने खेळला. त्यात त्याने 9 गडी टिपले. यासोबत आयपीएलमध्ये पहिली सुपर ओव्हर देखील त्यानेच टाकली होती. त्यात वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला बाद करून त्याने राजस्थानला विजय मिळवून दिला होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
तुम्ही त्याला वाईट म्हणून तुमच्यातील जळकी वृत्ती दाखवून दिली
“खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह नसतील तर चेंडूला लाळ लावू द्या”
आजच्याच दिवशी भारताने पाकिस्तानला विश्वचषकात ७व्यांदा पाजले होते पाणी