ख्राइस्टचर्च। हॅग्ली ओव्हल स्टेडियमवर रविवारपासून(३ जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात पाकिस्तानचा पहिला डाव २९७ धावांवरच उरकला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाकडून पहिल्या डावात केन विलियम्सनने शतकी खेळी केली आहे.
विलियम्सन या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर १७५ चेंडूत ११२ धावा करुन नाबाद आहे. त्याने या खेळीत १६ चौकार मारले आहेत. विशेष म्हणजे हे त्याचे गेल्या ४ सामन्यातील तिसरे शतक आहे. तर पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेतील दुसरे शतक आहे. त्याचबरोबर त्याने एक खास विक्रमही केला आहे.
विलियम्सनने विराटला टाकले मागे –
पाकिस्तानविरुद्ध सुरु असलेली कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा भाग आहे. त्यामुळे कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विलियम्सन अव्वल क्रमांकावर आला आहे. त्याने कसोटी चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व करताना ३ शतके केली आहे. याबरोबरच त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराटने कर्णधार म्हणून कसोटी चॅम्पियनशीपमध्ये २ शतके केली आहेत.
जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक शतके करणारे कर्णधार –
३ – केन विलियम्सन
२ – विराट कोहली
२ – अझर अली
१ – दिमुथ करुणारत्ने
१ – अजिंक्य रहाणे
दुसऱ्या दिवसाखरे न्यूझीलंडचे वर्चस्व –
या सामन्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानचा पहिला डाव २९७ धावांवर संपुष्टात आला होता. त्यांच्याकडून अझर अलीने ९३ आणि कर्णधार मोहम्मद रिझवानने ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच फहिम अश्रफने ४८ धावा करत योगदान दिले. तसेच न्यूझीलंडकडून गोलंदाजीत काईल जेमिसनने पहिल्या डावात सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडची टॉम लॅथम(३३) आणि टॉम ब्लंडेल(१६) ही सलामी जोडी लवकर बाद झाली. तसेच रॉस टेलरही(१२) स्वस्तात माघारी परतला. मात्र त्यानंतर विलियम्सनने हेन्री निकोल्सला साथीला घेत न्यूझीलंडचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या दिवसाखेर नाबाद २१५ धावांची भागीदारी रचली आहे. विलियम्सनसह निकोल्स ८९ धावांवर नाबाद खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सौरव गांगुलीला येत्या २-३ दिवसांत मिळणार डिस्चार्ज? रुग्णालयाने दिले हेल्थ अपडेट
“दर्शक स्टेडिममध्ये आणि आम्ही मात्र क्वारंटाइन, ही कसली वागणूक?” टीम इंडियाचा आरोप
‘क्रिकेट बॅट विक्रीला! संपर्क – स्मिथ व बर्न्स’, न्यूझीलंड प्रेक्षकाकडून ट्रोलिंग