भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना मंगळवारी (१४ जून) रिषभ पंतच्या नेतृत्वातील भारताने जिंकला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये मिळालेल्या लागोपाठ पराभवांनंतर अखेर चाहत्यांच्या मनाला शांती मिळाली. रिषभ पंतसाठी कर्णधाराच्या रूपातील ही त्याची पहिली मालिका आहे आणि मंगळवारी त्याला पहिला विजय देखील मिळाला आहे. असे असेल तरीही, पंतचे वैयक्तिक प्रदर्शन या तिन्ही सामन्यांमध्ये निराशाजनक राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
चालू वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी महत्वपूर्ण प्रदर्शन करणारा रिषभ पंत (Rishabh Pant) टी-२० मध्ये अद्याप स्वतःला सिद्ध करू शकला नाही. आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघात यष्टीरक्षकाची जागा मिळवण्यासाठी रिषभ पंत, संजू सॅमसन, इशान किशन आणि आता दिनेश कार्तिक देखील स्पर्धेत सहभागी झाला आहे. माजी दिग्गज कपिल देव (Kapil Dev) यांनी मात्र पंतला या स्पर्धेतूनच वगळले आहे.
कपिल देव म्हणाले की, “प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर जर मला विचारले की तुम्ही या तिघांपैकी (दिनेश कार्तिक, इशान किशन, संजू सॅमसन) एका यष्टीरक्षकाला निवडा, तर मला वाटते हे सर्वजण जवळपास एकाच पातळीचे आहेत. मला या तिघांमध्ये जास्त अंतर वाटत नाही. पण फलंदाजीच्या दृष्टीने पाहिले तर, प्रत्येक जण दुसऱ्यापेक्षा चांगला दिसत आहे.”
“त्यांचा दिवस असल्यावर हे तिघेही त्यांच्या जोरावर भारतीय संघाला सामना जिंकवून देऊ शकतात. जर तुम्ही रिद्धिमान साहाचा विचार केला, तर तो या तिघांपेक्षा तुलनेने खूप चांगला आहे, पण तरीदेखील गोष्ट जेव्हा फलंदाजीची येते, तेव्हा तिघेच्या तिघे त्याच्यापेक्षा खूप उत्तम आहेत. मी संजू सॅमसनवर खूपच नाराज आहे. तो खूप गुणवंत खेळाडू आहे, पण तो एक-दोन सामन्यांमध्ये धावा करतो आणि पुन्हा अपयशी होऊ लागतो. त्याने अजिबातच सातत्या दाखवले नाहीये,” असे कपिल देव पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, आयपीएल २०२२ मध्ये दिनेश कार्तिकने जबरदस्त पुनरागमन केले. आरसीबीने काही सामने एकट्या कार्तिकच्या फलंदाजीमुळे जिंकले. तर दुसरीकडे संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स अंतिम सामन्यापर्यत पोहोचला होता, पण अंतिम सामन्यात त्यांना पराभव मिळाला. सॅमसनने स्वतःच्या संघाला तब्बल १४ वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचवले, पण त्याचे वैयक्तिक प्रदर्शन मात्र समाधानकारक राहिले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
षटकार खाल्ल्याने दक्षिण आफ्रिकी गोलंदाजाचा चढला पारा, इशानशी छेडला वाद; मग त्यानेही दिलं प्रत्युत्तर
चल हवा येऊ दे! रूडचा मूड ऑफ करत नदालने पुन्हा दाखवून दिले, ‘आपणच आहोत लाल मातीचे बादशाह’






