रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यामुळे भारताचे विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देवही आश्चर्यचकित झाले आहेत. कपिल देव यांना वाटतं की, अश्विनला मायदेशात योग्य निरोप मिळायला हवा होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा केली. कपिल देव यांच्या मते अश्विन एखाद्या गोष्टीबाबत नाराज होता.
कपिल देव ‘पीटीआय’शी बोलताना म्हणाले, “भारताच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या अश्विननं क्रिकेट सोडण्याचा निर्णय अशाप्रकारे घेतला याचं मला आश्चर्य वाटलं. चाहते निराश झाले आहेत. मला त्याच्या चेहऱ्यावरही निराशा दिसली. तो निराश दिसत होता आणि तो दुःखी आहे. तो यापेक्षा चांगला निरोप घेण्यास पात्र होता.”
अश्विननं एका महत्त्वाच्या मालिकेदरम्यान निवृत्तीचा निर्णय घेतला. कपिल देव यांना त्यामागची कारणं जाणून घ्यायची आहेत. कपिल देव म्हणाले, “तो भारतात असताना निवृत्ती जाहीर करू शकला असता, पण त्यानं असं का केलं हे मला माहीत नाही. मला त्याची बाजूही ऐकायची आहे. त्यानं देशासाठी 106 कसोटी सामने खेळले. भारतीय क्रिकेटमधील त्याच्या योगदानाची बरोबरी कोणी करू शकेल असं मला वाटत नाही.”
कपिल देव यांनी आशा व्यक्त केली आहे की, बीसीसीआय अश्विनच्या भव्य निरोपाची व्यवस्था करेल. कपिल देव म्हणाले, “मला विश्वास आहे की बीसीसीआय या मॅचविनर खेळाडूच्या निरोपासाठी योग्य ती व्यवस्था करेल. तो एक महान अष्टपैलू आणि अपारंपरिक गोलंदाज होता, जो सतत आपला वेग बदलत असे.”
कपिल देव म्हणाले, “तो (अश्विन) नेहमी प्रयोग करण्यास तयार होता. यामुळेच तो इतरांपेक्षा वेगळा ठरला. ज्या खेळात फलंदाजांची अधिक प्रशंसा होते, तेथे अश्विननं स्वतःसाठी एक स्थान तयार केलं होतं. अश्विन एक धाडसी गोलंदाज होता. तो सामन्यात केव्हाही गोलंदाजी करू शकत होता. तो कर्णधाराचा आवडता गोलंदाज होता.”
कपिल देव म्हणाले, “तो भारताकडून सर्वाधिक मॅन ऑफ द सीरीज पुरस्कार जिंकणारा खेळाडू होता. तो एक असा खेळाडू होता ज्यानं कधीही हार मानली नाही. मी देवाचं आभार मानतो की मला त्याच्यासोबत खेळावं लागलं नाही. अश्विनमुळे मी माझं संघातील स्थान गमावलं असतं.”
हेही वाचा –
“माझ्या मुलाला जबरदस्तीनं निवृत्त करण्यात आलं”, आर अश्विनच्या वडिलांचा धक्कादायक आरोप!
चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आयसीसीची मोठी घोषणा, पुढील दोन विश्वचषकातही बदल
विराट कोहली लवकरच भारत सोडू शकतो, पत्नी अनुष्कासोबत इथे शिफ्ट होणार