भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात वादळी खेळी केली. भारतीय संघाने हा सामना 91 धावांनी जिंकला. सूर्यकुमारने या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील तिसरे टी20 शतक केले, ज्यासाठी सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. त्यानंतर आता भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी त्याचे कौतुक केले आहे.
श्रीलंकेविरुद्ध राजकोट टी20 मध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या सूर्याने वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही पद्धतीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने 33 चेंडूवर अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढील 50 धावांसाठी केवळ 12 चेंडू घेत 45 चेंडूवर 6 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने त्याने आपले तिसरे टी20 शतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत या सामन्यात 7 चौकार व 9 षटकारांच्या मदतीने 112 धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने या खेळी दरम्यान असे काही अद्भुत फटके मारले, जे सहसा फलंदाज मारताना दिसत नाहीत.
त्याच्या याच कामगिरीनंतर कपिल देव हे अत्यंत खूश झाले. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना सूर्यकुमारचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले,
“त्याचा खेळ पाहणे ही एक पर्वणी असते. त्याच्यासारखे खेळाडू शतकामध्ये एकदा जन्म घेतात.”
सध्या सूर्यकुमार यादव हा फलंदाजांच्या टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत केवळ 45 टी20 सामने खेळले आहेत. त्याच्या 43 डावांत त्याने तब्बल 46.41 च्या लाजवाब सरासरीने 1578 धावा केल्या असून, यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 180 पेक्षा जास्त राहिला आहे. तसेच त्याच्या नावे तीन शतके व तेरा अर्धशतकेही जमा आहेत.
(Kapil Dev said players like Suryakumar Yadav come once in a century)