कोची । हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) रविवारी एफसी गोवा संघाने केरळा ब्लास्टर्सला 2-1 असे हरविले. 13 मिनीटे बाकी असताना स्पेनचा मध्यरक्षक एदू बेदीया याने केलेला गोल निर्णायक ठरला.
नेहरू स्टेडियमवर ब्लास्टर्सला जोरदार पाठिंबा देणाऱ्या सुमारे तीस हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत गोव्याने हा बहुमोल विजय मिळविला. स्पेनचा स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास उर्फ कोरो याने सातव्याच मिनीटाला गोव्याचे खाते उघडले होते. सी. के. विनीतने ब्लास्टर्सला बरोबरी साधून दिली होती. पूर्वार्धात 1-1 अशी बरोबरी होती.
गोव्याने दहा सामन्यांत सहावा विजय मिळविला. एक बरोबरी व तीन पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांचे 19 गुण झाले. त्यांचा चौथा क्रमांक कायम राहिला. एफसी पुणे सिटी तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुण्याचे 11 सामन्यांतून 19 गुण आहेत, पण पुण्याचा 10 (21-11) गोलफरक गोव्याच्या 7 (24-17) पेक्षा सरस आहे.
77व्या मिनीटाला गोव्याला डावीकडे कॉर्नर मिळाला. त्यावर ब्रँडन फर्नांडीसने चेंडू अचूकपणे क्रॉस मारला. बेदीयाला मोकळिक मिळाली होती, कारण त्याचे मार्किंग झाले नव्हते. याचा फायदा घेत त्याने हेडिंग करीत गोल नोंदविला.
गोव्याने सातव्याच मिनीटाला खाते उघडले. ब्रँडन फर्नांडीसने डावीकडून अप्रतिम चाल रचत मंदार राव देसाई याला पास दिला. मंदारने कोरोकडे चेंडू सोपविला. बॉक्सच्या मध्यभागी असलेल्या कोरोने चेंडू मिळताच आधी फटका मारण्याची अॅक्शन केली, पण काही सेकंद थांबून किक मारली. त्यामुळे ब्लास्टर्सचा गोलरक्षक पॉल रॅचूब्का चकला.
29व्या मिनीटाला ब्लास्टर्सने बरोबरी साधली. सियाम हंगलने हेडींग करीत विनीतच्या दिशेने चेंडू मारला. त्यावर विनीतने उत्तम किकने चेंडू मारत गोव्याचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याला चकविले.
दोन्ही संघांनी सुरवातीपासून सकारात्मक खेळ केला. चौथ्याच मिनीटाला गोव्याच्या मॅन्युएल लँझारोटेने डाव्या पायाने ताकदवान फटका मारला, पण चेंडू क्रॉसबारला लागून समोर पडला. ब्लास्टर्सच्या संदेश झिंगनने चपळाईने रिबाऊंडचा धोका टाळला. 11व्या मिनीटाला मंदारने डावीकडून आगेकूच करीत मारलेला चेंडू अडविताना रॅचुब्का अडखळला, पण त्याने चेंडू कसाबसा अडविला. 16व्या मिनीटाला झिंगनने ताकदीच्या जोरावर कोरोला रोखले.
18व्या मिनीटाला जॅकीचंद सिंगने क्रॉस पास दिला होता, पण तो चेंडू एका खेळाडूला लागून आल्यामुळे इयन ह्युमला ताकदवान हेडींग करता आले नाही. परिणामी कट्टीमनीला अचूक बचाव करता आला. 25व्या मिनीटाला हंगलने ताकदीने मारलेला चेंडू थोडक्यात क्रॉसबरला लागला.
मध्यंतराच्या 1-1 अशा बरोबरीनंतर उत्तरार्धात दोन्ही संघ आघाडीसाठी जोरदार खेळ करणे अपेक्षित होते. 50व्या मिनीटाला लालरुथ्थाराने लँझारोटेला धसमुसळ्या पद्धतीने रोखले. त्यामुळे गोव्याला फ्री-किक मिळाली. ती लँझारोटेनेच घेतली, पण त्याने नेटवरून स्वैर फटका मारला. 52व्या मिनीटाला झिंगनने झेपावत हेडींग करीत विनीतकडे चेंडू मारला. विनीतने डाव्या पायाने फटका मारला, पण त्यात अचूकता आणि ताकद नव्हती. त्यामुळे कट्टीमनी चेंडू सहज अडवू शकला.
58व्या मिनीटाला मंदारने अशक्यप्राय स्थितीत केलेला प्रयत्न फोल ठरला. 64व्या मिनीटाला जॅकीचंदने उजवीकडून चार रचत विनीतला क्रॉस पास दिला. विनीतने त्यावर बायसिकल किक मारली, पण त्यात अचूकता नव्हती.
निकाल :
केरळा ब्लास्टर्स एफसी :1 (सी. के. विनीत 29)
पराभूत विरुद्ध एफसी गोवा : 2 (फेरॅन कोरोमीनास 7, एदू बेदिया 77)