टोक्यो येथे पार पडलेल्या जपान ओपन 2018 मध्ये जपानच्याच केंटो मोमोटाने विजय मिळवला. अंतिम सामन्यातील त्याचा थायलंडचा प्रतिस्पर्धी खोसिट फेटप्रदाबचा 21-14, 21-11 असा सरळ सेट मध्ये पराभव करत त्याने सहज विजय मिळवला.
रविवारी झालेल्या या सामन्यात एकतर्फी विजय मिळवत मोमोटा हा पुरुष एकेरीत ही स्पर्धा जिंकणारा जपानचा पहिलाच खेळाडू ठरला. 24 वर्षीय मोमोटाने आपला शेवटचा पॉईंट स्मॅश मारत विजय साजरा केला. विजयानंतर आपल्या शर्टवरील जपानी लोगोचे चुंबन घेत त्याने आनंद व्यक्त केला.
सामन्यादरम्यान मी स्वतःला “फक्त अजून दोन पॉईंट असे सतत सांगत होतो” असे जिंकल्यावर मोमोटा म्हणाला. मोमोटाला गैरवर्तनाच्या कारणावरून 2016 रिओ आँलिम्पिक मधून बाहेर जावे लागले होते.
एशियन गेम्स मध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या मोमोटाने जपान ओपनच्या उप-उपांत्य सामन्यात चीनच्या दोन वेळा ऑलिम्पिक विजेत्या लीन डॅनचा पराभव केला होता.
ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मरिनने जपान ओपनमध्ये जपानच्या नोझोमी ओकुहारा हिचा महिला एकेरीत 21-19, 17-21, 21-11 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
तीन वेळा विश्वविजेता असलेल्या कॅरोलिनाने आक्रमक स्मॅश आणि कडवा प्रतिकार करत सामना आपल्याकडे खेचून आणला.
जपान ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर 750 या मालिकेतून किदांबी श्रीकांत शुक्रवारी बाहेर पडला. उप-उपांत्य सामन्यात कोरियाच्या ली डॉंग केन याने श्रीकांतचा 21-19, 16-21, 18-21 असा पराभव केला. सोबतच पी.व्ही सिंधू आणि एच.एस प्रणॉय यांना साखळी फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या:
–रोनाल्डोला युवेंटससाठी पहिला गोल करण्यास लागले तब्बल ३२० मिनिटे