पुणे। आज(13 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि 137 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या पराभवामुळे त्यांना 3 सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशी पिछाडी स्विकारावी लागली आहे.
या पराभवापाठोपाठ त्यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचा फिरकी गोलंदाज केशव महाराज 19 ऑक्टोबरपासून रांचीला सुरु होणाऱ्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.
त्याला पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी दरम्यान दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करत असताना खांद्याची दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतरही त्याने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात 72 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात 22 धावांची खेळी केली.
पण त्याच्या दुखापतीच्या तपासणीचा रिपोर्ट आल्यानंतर तो तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी फिट नसल्याचे दिसून आले आहे. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी 14 ते 21 दिवस लागणार आहेत.
त्याच्याऐवजी दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षीय जॉर्ज लिन्ड याची बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे. त्यामुळे आता जॉर्जला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळणार आहे. त्याने आत्तापर्यंत 45 प्रथम श्रेणी सामने खेळली असून यामध्ये 1497 धावा केल्या आहेत आणि 160 विकेट्स घेतल्या आहेत.
#CSAnews George Linde to replace Keshav Maharaj https://t.co/GQbsgy4HoD pic.twitter.com/3xcseDLRux
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 13, 2019