पुणे। महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणामध्ये पदकांची लयलूट कायम राखताना शनिवारी चार सुवर्ण व तीन रौप्यपदके जिंकली.
महाराष्ट्राच्या अपेक्षा फर्नांडिस हिने १७ वषार्खालील गटात चारशे मीटर्स मिडले शर्यत ५ मिनिटे २३.३६ सेकंदात जिंकली. या शर्यतीत महाराष्ट्राच्या सिया बिजलानी हिचे ब्राँझपदक थोडक्यात हुकले. याच वयोगटात महाराष्ट्राच्या केनिशा गुप्ता हिने १०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. तिने हे अंतर ५९.७८ सेकंदात पार केले.
मुलींच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राच्या साध्वी धुरी हिने शंभर मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीचे विजेतेपद पटकाविले. तिला ही शर्यत पूर्ण करण्यासाठी एक मिनिट १.०२ सेकंद वेळ लागला. पंधराशे मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋतुजा तळेगावकर हिने रौप्यपदक पटकाविले. तिने हे अंतर १८ मिनिटे ५३.३६ सेकंदात पूर्ण केले. तामिळनाडूच्या भाविका दुगर हिने ही शर्यत १८ मिनिटे १३.०७ सेकंदात पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले.
महाराष्ट्राला शनिवारी चौथे सुवर्णपदक मिहिर आंम्ब्रे याने जिंकले. त्याने २१ वषार्खालील गटात शंभर मीटर्स बटरफ्लाय शर्यत ५६.१० सेकंद वेळ लागला. याच वयोगटातील ४०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत महाराष्ट्राच्या सुश्रुत कापसे याला रौप्यपदक मिळाले. त्याला हे अंतर पार करण्यास ४ मिनिटे १०.७५ सेकंद वेळ लागला. कर्नाटकच्या कुशाग्र रावत याने ही शर्यत चार मिनिटे ०१.८३ सेकंदात जिंकली. या वयोगटातील चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यांनी हे अंतर चार मिनिटे ०१.७० सेकंदात पूर्ण केले. कर्नाटकच्या खेळांडूंनी ही शर्यत तीन मिनिटे ५६.३८ सेकंदात जिंकली.