पुणे। महाराष्ट्राच्या गार्गी पवार हिने दुहेरीत सुवर्ण व एकेरीत ब्राँझपदक जिंकले आणि टेनिसमधील १७ वर्षाखालील गटात कौतुकास्पद कामगिरी केली. तिने दुहेरीत प्रेरणा विचारे हिच्या साथीत १७ वर्षाखालील दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. मुलांच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या अरमान भाटिया व ध्रुव सुनीश ही जोडी विजेती ठरली. महाराष्ट्राने या सुवर्णपदकांबरोबरच तीन रौप्य व एक ब्राँझपदकाचीही कमाई केली.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. गार्गी हिने दुहेरीत प्रेरणाच्या साथीत महाराष्ट्राच्याच सई भोयार व ह्रदया शहा यांचा ६-१, ६-१ असा दणदणीत पराभव केला. त्यांनी पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ करताना सर्व्हिसवरही चांगले नियंत्रण राखले होते. तसेच त्यांनी नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. गार्गी हिने त्याआधी एकेरीत ब्राँझपदकासाठी झालेल्या लढतीत आंध्रप्रदेशच्या लक्ष्मी रेड्डी हिच्यावर ६-३, ६-३ असा सफाईदार विजय मिळविला. तिने दोन्ही सेट्समध्ये क्रॉसकोर्ट फटक्यांचा चौफेर खेळ केला. तसेच तिने बॅकहँडचेही सुरेख फटके मारले.
हे पदक माझ्या वडिलांनाच समर्पित : गार्गी
खेलो इंडिया महोत्सवात मी पदक मिळविले पाहिजे असे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. येथे मी त्यांचे स्वप्न साकार केले तथापि माझे हे यश पाहण्यासाठी ते हयात नाहीत याचेच मला दु:ख वाटते असे सांगून गार्गी म्हणाली, आदर पूनावाला अकादमीचे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीवायसी जिमखाना येथे सराव करते. यापूर्वी सोळा वषार्खालील गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत मला विजेतेपद मिळाले होते. त्या अनुभवाचा फायदा मला येथे दोन पदके मिळविताना झाला.
मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या मिहिका यादव हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत तिला अव्वल मानांकित खेळाडू महेक जैन हिने ६-४, ६-१ असे पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये महेक हिला मिहिका हिने चिवट झुंज दिली. तथापि दुसºया सेटमध्ये महेक हिच्या आक्रमक खेळापुढे मिहिका हिला प्रभाव दाखविता आला नाही.
मुलांच्या १७ वर्षाखालील गटात आर्यन भाटिया या महाराष्ट्राच्या खेळाडूला गुजरातच्या देव जेविया याच्यापुढे पराभव पत्करावा लागला. हा सामना देव याने ७-५, ६-३ असा जिंकला. पहिल्या सेटमध्ये आर्यन याने चांगला खेळ केला. तथापि दोन्ही सेट्समध्ये त्याची सर्व्हिसब्रेक करण्यात देव याला यश मिळाले.
आर्यन याचा मोठा भाऊ अरमान याने ध्रुव याच्या साथीत २१ वर्षाखालील दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. त्यांनी नितीन सिन्हा व इशाक इक्बाल या बंगालच्या खेळाडूंचा २-६, ६-३, १०-६ असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर त्यांनी सर्व्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवीत विजयश्री खेचून आणली.