पुणे। खरंतर कबड्डीमध्ये करिअर करण्याचे ठरविलेल्या अवंतिका नराळे हिने हा निर्णय बदलून अॅथलेटिक्सचे करिअर निवडले. हा निर्णय सार्थ ठरवित तिने येथे सतरा वषार्खालील गटात दोनशे मीटर्स धावण्याची शर्यत जिंकली. महाराष्ट्राच्या दिनेश सिंग याने २१ वषार्खालील गटाच्या दहा हजार मीटर्स धावण्याची शर्यत जिंकून नेत्रदीपक कामगिरी केली. अक्षय गोवर्धन याने मुलांच्या दोनशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत ब्राँझपदक जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया स्पर्धेत प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादाच्या उपस्थितीत अवंतिका हिने दोनशे मीटर्सचे अंतर २४.४७ सेकंदात पार केले. तेलंगणाची जीवनजी दीप्ती (२५.२६ सेकंद) व उत्तरप्रदेशच्या प्रियंंका सिकरवार (२५.४८ सेकंद) यांना अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक मिळाले.
अवंतिका हिने दोन वेळा दोनशे मीटर्स शर्यतीत कुमार गटातील राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. राष्ट्रीय विक्रमाची नोंद करताना तिने आंतरराष्ट्रीय खेळाडू दुती चंद हिचा विक्रम मोडला होता आणि नंतर तिने पुन्हा आपलाच विक्रम मागे टाकला. गतवर्षी तिने नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत वेगवान धावपटूचा मान मिळविला होता. अवंतिका ही संजय पाटणकर आणि सुधाकर मेमाणे यांच्याकडे मार्गदर्शन घेते.
अवंतिकाची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, तिचे आई-वडील पोटाला चिमटा काढून लेकीचे स्वप्न साकारण्यास मदत करतात. वडिल संतोष नराळे प्लंबिंग ची कामे करतात आणि त्यावरच त्यांचे घर चालते. आपल्या कुटुंबाची ही परिस्थिती बदलण्याची इच्छा तिने या वेळी बोलताना व्यक्त केली. त्यांच्या आशिवार्दामुळेच मी या यशापर्यंत पोहोचले आहे. त्यांना हातभार लावण्यासाठी अॅथलेटिक्समध्ये समृद्ध करिअर करण्याचे माझे ध्येय आहे असे अवंतिका हिने सांगितले.
अवंतिकाने लोणकर प्रशालेतील आपल्या शिक्षकांचेही आभार मानले. ती म्हणाली, शाळेतील क्रीडा शिक्षक शिवाजी म्हेत्रे यांनी मला धावण्याची गळ घातली आणि शाळेसाठी पहिल्याच स्पर्धेत बुटाशिवाय धावतानाही मी सुवर्णपदकाला गवसणी घातली. तेव्हापासून शाळेने देखील मला सतत सहकार्य केले आहे. सराव आणि स्पर्धा सहभाग यामुळे शाळेतील उपस्थितीवर त्याचा परिणाम व्हायचा. मात्र, शाळेने मला याबाबत स्वातंत्र्य दिले. त्यामुळे मी खेळाबरोबर शिक्षणही घेऊ शकले आहे.
१७ वषार्खालील गटात मुलांच्या दोनशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत अक्षय गोवर्धन याचे रौप्यपदक थोडक्यात हुकले. त्याने हे अंतर २२.१३ सेकंदात पार केले. आंध्रप्रदेशचा श्रीनिवास षणमुगम (२१.९२ सेकंद) व दिल्लीचा अंशुलकुमार (२१.९३ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई केली.
दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता
मुलांच्या २१ वषार्खालील गटात दिनेश सिंग याने दहा हजार मीटर्सचे अंतर ३१ मिनिटे ५८.१६ सेकंदात पार करीत विजेतेपदावर नाव कोरले. त्याने सुरेख धाव घेत ही शर्यत जिंकली. मूळचा तो उत्तरप्रदेशचा खेळाडू आहे. दोन वषार्पासून तो नाशिक येथे विजेंदरसिंग यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. या अकादमीत प्रवेश घेतल्यानंतर आपल्या कामगिरीत सुधारणा झाली आहे असे दिनेश सिंग याने सांगितले.
येथील शर्यतीत उत्तरप्रदेशचा कार्तिक कुमार याने ही शर्यत ३२ मिनिटे १५.४५ सेकंदात पार करीत रौप्यपदक पटकाविले. गुजरातच्या विशाल मकवाना याला ब्राँझपदक मिळाले. त्याने हे अंतर ३२ मिनिटे २०.३४ सेकंदात पूर्ण केले.