पुणे। समीर कुरेशी याने लागोपाठ दोन वेळा तीन गुणांची नोंद केली, त्यामुळेच बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राने उत्तरप्रदेशवर ७४-६७ अशी मात केली. या सामन्यासह महाराष्ट्राने बास्केटबॉलमधील मुलांच्या २१ वर्षाखालील गटात झकास सलामी केली. मुलींच्या १७ वषार्खालील गटात मात्र महाराष्ट्राला पहिल्या लढतीत तामिळनाडूविरुद्ध ६३-७१ असा पराभव स्वीकारावा लागला.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे म्हाळुंगे बालवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात खेलो इंडिया स्पर्धा सुरु आहे. त्यात महाराष्ट्र व उत्तरप्रदेश हा सामना विलक्षण रंगतदार झाला. पूर्वार्धात महाराष्ट्राने ३९-२९ अशी आघाडी घेतली होती. तथापि तिसऱ्या डावाच्या अखेरीस उत्तरप्रदेशने ५७-५० अशी आघाडी मिळविली. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना त्यांच्याकडे ६२-५७ अशी आघाडी होती. मात्र त्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळास अचूकतेची जोड देत विजयश्री खेचून आणली. त्याचे श्रेय समीर कुरेशी (१४ गुण), अक्षय खरात (१५ गुण) व अर्जुन यादव (१७ गुण) यांच्या खेळास द्याावे लागेल. उत्तरप्रदेशच्या धीरज मयूर (१४ गुण) व प्रसून मिश्रा (१२ गुण) यांचे प्रयत्न अपुरे ठरले. या वयोगटातील अन्य सामन्यात पंजाबने राजस्थानचा ८१-६३ असा पराभव केला.
मुलींमध्ये तामिळनाडूने महाराष्ट्राविरुद्ध पूर्वार्धात ३८-२८ अशी आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्यांच्यासाठी निर्णायक ठरली. या लढतीत तामिळनाडूकडून एस.वर्षिनी व एस. पवित्रा यांनी प्रत्येकी चौदा गुण नोंदविले. महाराष्ट्राकडून सिया देवधर व शोमिरा बिडये यांनी प्रत्येकी बारा गुण नोंदवित चांगली लढत दिली.अन्य लढतीत उत्तरप्रदेशने कर्नाटक संघाला ७१-४० असे सहज हरविले.