आयपीएल 2026 चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत निराशाजनक ठरला असला, तरी आता संघाचे फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्डवर कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी पंजाब किंग्जविरुद्धच्या रोमांचक सामन्यात मुंबईने विजय मिळवला असला तरी, सामन्यादरम्यानच्या वर्तनामुळे पोलार्डला त्याच्या सामना शुल्काच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. त्याच्यावर अपशब्द वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला असून तो या प्रकरणी दोषी आढळला आहे.
शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात, आयपीएलने स्पष्ट केले की पोलार्डने खेळाडू आणि संघाच्या अधिकाऱ्यांना लागू असलेल्या आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्याने आचारसंहितेच्या कलम 2.3 चे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. हे कलम अपशब्द वापरणे आणि आक्षेपार्ह वर्तनाशी संबंधित आहे. विशेष म्हणजे, पोलार्डने आपला गुन्हा कबूल केला. सामना पंच पंकज धरमणी यांनी सुनावलेली शिक्षा मान्य केली.
ही घटना दुसऱ्या डावाच्या 19व्या षटकादरम्यान घडल्याचे समजते, ज्यावेळी मुंबई इंडियन्स फलंदाजी करत होते. त्यावेळी, पोलार्डने चौथ्या पंचांना (Fourth Umpire) उद्देशून अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर, IPL प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली आणि शिस्तभंगाची कारवाई सुरू केली.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 8 गड्यांच्या मोबदल्यात एकूण 200 धावा उभारल्या. प्रभसिमरन सिंग 57 धावांसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, तर अझमतुल्ला उमरझाईने 38 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. मुंबईकडून, शार्दुल ठाकूरने भेदक गोलंदाजी करत 4 बळी मिळवले. दीपक चहरने 2 बळी घेतले, तर राज बावा आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, रोहित शर्मा आणि रायन रिकलटन यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 61 धावांची भागीदारी रचली. रिकलटन 48 धावा काढून बाद झाला. त्यानंतर, नमन धीर आणि रोहित शर्मा हे दोघेही लवकर बाद झाल्यामुळे, मुंबईची अवस्था 3 बाद 88 अशी नाजूक झाली होती. मात्र, तिलक वर्माने एका टोकाकडून डावाची सूत्रे हाती घेतली आणि शेवटपर्यंत नाबाद राहत आपल्या संघाला विजयापर्यंत नेले.
तिलक वर्माने अवघ्या 33 चेंडूंत 75 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. विल जॅक्सने नाबाद 25 धावांचे योगदान देत मोलाची साथ दिली. मुंबईने हा सामना 6 गडी राखून जिंकला.
दरम्यान, पंजाब किंग्जचा हा सलग पाचवा पराभव ठरला. परिणामी, प्ले-ऑफमधील त्यांचा मार्ग आणखीच कठीण झाला आहे. आतापर्यंत, पंजाबने 12 सामन्यांत 6 विजय मिळवत 13 गुण जमा केले असून, गुणतालिकेत ते चौथ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले असून, सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत.






