इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१मध्ये पाच वेळेस विजेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्स संघ १४ व्या हंगामात संघर्ष करताना दिसतोय. स्पर्धेच्या उत्तरार्धात संघाला सलग ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेला. मात्र, मंगळवारी (२८ सप्टेंबर) झालेल्या पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत या संघाने पुनरागमन केले. या विजयात संघाचा उपकर्णधार कायरन पोलार्डने गोलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर आता याबाबत स्वतः पोलार्डने प्रतिक्रिया दिली आहे.
पोलार्डचे गेम चेंजिंग षटक
पंजाब विरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू कायरन पोलार्डने एक षटक टाकताना ८ धावा देत पंजाबचा कर्णधार केएल राहुल व दिग्गज ख्रिस गेल यांना बाद करत पंजाबला सामन्यात मागे ढकलले. यासह त्याने टी२० क्रिकेटमध्ये ३०० बळी पूर्ण केले. आपल्या या अप्रतिम कामगिरीनंतर बोलताना पोलार्ड म्हणाला,
“गोलंदाजीला मदतगार खेळपट्टी असेल तर, रोहित माझ्यासाठी एक षटक राखून ठेवतो. गोलंदाजी म्हणजे केवळ गडी बाद करणे होय. माझ्याकडे जास्त वेग नाही की चेंडूला स्विंग करण्याची क्षमता नाही. परंतु, माझ्याकडे बुद्धी आहे आणि मी त्याचा वापर करून गडी बाद करतो.”
मुंबईचे शानदार विजयासह पुनरागमन
अबुधाबी येथे झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाब किंग्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना एडेन मार्करमने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. अष्टपैलू दीपक हुड्डाने २८ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर पंजाब संघाला २० षटकाअखेर १३५ धावा करण्यात यश आले. या धावांचा पाठलाग करताना मुंबईसाठी सौरभ तिवारीने सर्वाधिक ४५ धावा फटकावल्या. हार्दिक पंड्याने तुफान फटकेबाजी करत नाबाद ४० धावांचे योगदान दिले आणि मुंबई इंडियन्स संघाला ६ गडी राखत विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
अरर! स्वतःचीच यष्टी उखडून फलंदाज विचित्र पद्धतीने बाद, व्हिडिओ बघून व्हाल लोटपोट
दिल्लीच्या पराभवाने विजयी मुंबईला धक्का, टॉप-४ मध्ये उडी घेण्याची हुकली संधी; पाहा अपडेटेड गुणतालिका
अखेर हास्य परतलं; सलग ३ पराभवांनंतर मुंबईच्या ताफ्यात आनंदाची लहर, रितीका-नताशाचीही खुलली कळी