कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला पुन्हा एकदा शिस्तभंगाचा फटका बसला आहे. यावेळी तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलची आचारसंहिता मोडल्याप्रकरणी दोषी आढळला. यानंतर त्याला मॅच फीच्या 100 टक्के दंड आणि एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
आयपीएलनं आपल्या निवेदनात म्हटलं की, “हर्षित राणानं आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.5 अंतर्गत लेव्हल 1 गुन्हा केला आहे. त्यानं आपला गुन्हा कबूल केला आणि मॅच रेफरीने ठोठावलेला दंडही मान्य केला. आचारसंहितेच्या भंगाच्या पातळीबाबत सामनाधिकारींचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. या खेळाडूला यापूर्वी आयपीएल आचारसंहितेच्या समान पातळी आणि कलमानुसार दंडही ठोठावण्यात आला होता.”
यापूर्वी हर्षित राणाला त्याच्या मॅच फीच्या 60 टक्के दंड ठोठावण्यात आला होता. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मयंक अग्रवालला बाद केल्यानंतर राणानं त्याला ‘फ्लाइंग किस’ दिला. तर मंगळवारी अभिषेक पोरेलला बाद दिल्यानंतर राणानं पुन्हा एकदा ‘फ्लाइंग किस’ देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानं शेवटच्या क्षणी आपला हात थांबवला आणि डगआउटकडे बोट दाखवत विकेट साजरी केली. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
या सामन्यात हर्षित राणानं चार षटकात केवळ 28 धावा देत 2 बळी घेतले. दिल्लीच्या डावातील सातवं षटक टाकताना त्यानं अभिषेक पोरेलची विकेट घेतली. यानंतर त्यानं हात हलवत इशारा केला. त्यामुळे हर्षितवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, कोलकाता नाईट रायडर्सने सोमवारी दिल्ली कॅपिटल्सचा 21 चेंडू बाकी असताना 7 गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 153 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरनं हे लक्ष्य 16.3 षटकांत तीन गडी गमावून गाठलं.
या विजयानंतर, कोलकाता नाईट रायडर्स संघ आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला असून ते प्लेऑफसाठी पात्र होण्याच्या काठावर आहेत. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्सचा 11 सामन्यांमधला हा सहावा पराभव आहे. ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. दिल्लीकडे अजूनही प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे टीम इंडियाची निवड? स्पर्धेत ठसा उमटवणाऱ्या ‘या’ 5 खेळाडूंची लागली लॉटरी
केएल राहुलचं टी20 विश्वचषकात खेळण्याचं स्वप्न भंगलं! मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडलाही संधी नाही