टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड टी20 विश्वचषकानंतर संघाची साथ सोडणार आहेत. त्यामुळे आता बीसीसीआयनं नव्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी बोर्डानं अर्ज मागवले असून भारतीय आणि परदेशी अशी अनेक हाय-प्रोफाइल नावं संभाव्य उमेदवार म्हणून समोर आली आहेत. मात्र, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाला अनेक बड्या नावांनी नकार दिला आहे.
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी स्पष्ट केलं की, 2024 च्या आयपीएल दरम्यान त्यांच्याशी अनौपचारिकपणे संपर्क साधण्यात आला होता. मात्र पॉऩ्टिंगनं आपण या शर्यतीत नसल्याचं म्हटलं आहे. तसेच सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथ म्हणाले की, दीर्घकाळापासून संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले स्टीफन फ्लेमिंग यांनाही ही जबाबदारी घेण्यात रस नाही.
दरम्यान, आता माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनीही या शर्यतीतून माघार घेतली आहे. त्यांनी यापूर्वी प्रशिक्षकपदासाठी रस दाखवला होता, मात्र आता त्यांनी नकार दिला आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, लँगर यांच्या नकारामागचं कारण दुसरं कोणी नसून टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल आहे!
लँगर म्हणाले की, “कोणत्याही संघाचं मुख्य प्रशिक्षक म्हणून काम थकवणारं असतं. मी या पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. मला माहित आहे की, ही एक मोठी भूमिका आहे. मात्र ऑस्ट्रेलियन संघासोबत चार वर्ष काम केल्यानंतर, हे काम थकवणारं असल्याचं लक्षात आलंय.”
लँगर पुढे म्हणाले की, “भारतीय संघ कसा आहे याबद्दल मी आमच्या संघाचा कर्णधार केएल राहुलशी बोलले. तो म्हणाला, जर तुम्हाला वाटत असेल की आयपीएलच्या संघात दबाव आणि राजकारण आहे, तर त्याला हजार पटीनं गुणा. भारतीय संघाचं मुख्य प्रशिक्षकपद सांभाळताना एवढा दबाव येईल. मला वाटतं की हा चांगला सल्ला होता. हे एक उत्तम काम असेल, परंतु सध्या मी त्याच्यासाठी तयार नाही.”
जस्टिन लँगर मे 2018 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक होते. 2018 च्या बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाचा पदभार स्वीकारला होता. यानंतर त्यांनी कर्णधार टीम पेनसोबत मिळून ज्या प्रकारे संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं, त्याबद्दल त्यांचं कौतुक झालं होतं. मात्र काही काळानंतर खेळाडू आणि पॅट कमिन्स सोबतच्या मतभेदांच्या अफवांमुळे त्यांनी राजीनामा दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल 2025च्या हंगामात महेंद्र सिंह धोनी चेन्नईकडून खेळताना दिसणार का?
भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकिट 16 लाख रुपये, तर सर्वात स्वस्त सुमारे 25 हजार रुपये…
संजू सॅमसन अनुभवी शेन वॉर्नला टाकणार मागे, लिहिणार कर्णधारपदाचा नवा अध्याय..