पंजाब किंग्ज विरूद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना आज (१८ एप्रिल) मुंबईच्या मैदानावर खेळवला गेला. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता तर एक सामना दोन्ही संघांनी गमावला होता. त्यामुळे आजच्या सामन्याद्वारे विजयी लय परत मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न होता.
या सामन्यात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र हा निर्णय फारसा फलदायी ठरला नाही. पंजाबचे सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांनी दमदार सलामी नोंदवली. त्यांनी या सामन्यात १२२ धावांची भागीदारी रचली. यासह सलामीचा एक विक्रम देखील आपल्या नावे केला.
राहुल-मयंक अव्वल स्थानी
आजच्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यात केएल राहुल आणि मयंक अगरवाल या दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी दिल्लीच्या गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवत १२ षटकांतच १२२ धावांची सलामी नोंदवली. ही सलामी भागीदारी आयपीएल मध्ये दिल्लीच्या संघाविरुद्ध नोंदवलेली सर्वोच्च सलामी भागीदारी ठरली. यापूर्वी हा विक्रम ड्वेन स्मिथ आणि ब्रेन्डन मॅक्युलम यांच्या नावे होता. त्यांनी २०१६ साली गुजरात लायन्सच्या संघाकडून खेळतांना ११२ धावांची सलामी नोंदवली होती. आता हा विक्रम राहुल आणि मयंकच्या नावे झाला आहे.
दिल्ली विरूद्ध सर्वोच्च सलामी भागीदारी –
१) १२२ – केएल राहुल व मयंक अगरवाल – २०२१*
२) ११२ – ड्वेन स्मिथ व ब्रेन्डन मॅक्युलम – २०१६
३) १०८ – राहुल द्रविड व अजिंक्य रहाणे – २०१३
दिल्लीला १९६ धावांचे आव्हान
दरम्यान, राहुल आणि मयंकच्या या भागीदारीमुळे पंजाबला दमदार सुरुवात मिळाली. उर्वरित फलंदाजांनी अखेरच्या षटकात फटकेबाजी केल्याने पंजाबने निर्धारित २० षटकांत ४ बाद १९५ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीला यंदाच्या आयपीएल मधील दुसरा विजय मिळविण्यासाठी १९६ धावांचे विशाल आव्हान पार करावे लागणार होते.
महत्वाच्या बातम्या:
पाहता पाहता आयपीएल सुरु होऊन १३ वर्ष झाली! पाहा या १३ वर्षातील खास आकडेवारी
चेन्नईला मागे टाकत बंगलोरचा खास विक्रम, या यादीत गाठले अव्वल स्थान