इंडियन प्रीमीयर लीग २०२१ (आयपीएल २०२१) मधील ५३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात गुरुवारी (७ ऑक्टोबर) खेळला गेला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने ६ गडी राखून विजय मिळवला. यासह त्यांच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशाही जिवंत राहिल्या आहेत. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने नाबाद ९८ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने एका मोठ्या विक्रमात ख्रिस गेल व डेव्हिड वॉर्नर यांची बरोबरी केली.
राहुलची तुफानी खेळी
प्ले ऑफची आशा अधिक उंचावण्यासाठी पंजाबला या सामन्यात १३५ धावांचे आव्हान ११ षटकात गाठण्याची गरज होती. कर्णधार राहुलने या डावाची सूत्रे हाती घेत आक्रमक सुरुवात केली. त्याने ४२ चेंडूत ७ चौकार व ८ गगनचुंबी षटकारांची आतिषबाजी करून नाबाद ९८ धावांची लाजवाब खेळी केली. यासह त्याने सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीतील आपले पहिले स्थान आणखी मजबूत केले.
गेल व वॉर्नरची केली बरोबरी
राहुलने या खेळीदरम्यान आयपीएल २०२१ मध्ये ६०० धावांचा टप्पा पार केला. आपल्या आयपीएल कारकिर्दीत त्याने तिसऱ्यांदा अशी कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय बनला आहे. त्याच्यापूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळताना दिग्गज सलामीवीर ख्रिस गेल व दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यासाठी खेळताना तीन हंगामांत ६०० धावांचा टप्पा पार केला.
पंजाबचा रोमांचक विजय
गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्स व सहाव्या क्रमांकावर पंजाब किंग्स यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने फाफ डू प्लेसिसच्या ७६ धावांच्या जोरावर ६ बाद १३४ धावा बनविल्या. प्रत्युत्तरात, कर्णधार राहुलने तुफानी खेळी करत सामना एकतर्फी बनवला. या सामन्यात पराभूत झाला असला तरी चेन्नई गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.