भारत विरुद्ध इंग्लंडच्या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना आज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र भारतीय संघाने या संधीचा फायदा उचलत मागच्या सामान्य प्रमाणेच ३०० धावांची वेस ओलांडली. पहिल्या डावात निर्धारित ५० षटकांत भारताने ६ बाद ३३६ धावा उभारल्या.
यात केएल राहुलच्या शतकाचा मोठा वाटा होता. भारताच्या डावात सलामीवीर लवकर बाद झाल्यावर त्याने कर्णधार विराट कोहलीसह मोठी भागीदारी करत संघाला ३०० धावांचा टप्पा गाठून देण्यात मदत केली. यात त्याने ११४ चेंडूत १०८ धावांची खेळी केली. याच खेळीत त्याने एक खास कारनामा देखील केला.
मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड
केएल राहुल गेल्या काही सामन्यात खराब फॉर्मातून जात होता. मात्र वनडे मालिकेद्वारे त्याने आपला फॉर्म परत मिळवला आहे. त्याने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकवले होते. तर आजच्या सामन्यात त्यात सुधारणा करत शतक झळकावण्याची किमया केली. मात्र या खेळी दरम्यान एक खास रेकॉर्ड त्याच्या नावे झाला. या खेळीत त्याने वनडे सामन्यातील १५०० धावांचा टप्पा ओलांडला. यासह भारताकडून सर्वात कमी डावात १५०० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला.
त्याने आपल्या ३६व्या डावात ही कामगिरी करत विराट कोहलीला मागे टाकले. यापूर्वी विराट कोहलीने ३८ डावात ही कामगिरी केली होती. या यादीत भारतीय संघाचा विद्यमान सलामीवीर शिखर धवन तिसर्या स्थानावर असून त्याने देखील ३८ डावात ही किमया केली होती. त्यांच्यानंतर नवजोतसिंग सिद्धू आणि सौरव गांगुली हे माजी खेळाडू या यादीत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.
भारताकडून वनडेत सर्वात कमी डावात १५०० धावा करणारे खेळाडू –
१) केएल राहुल – ३६*
२) विराट कोहली – ३८
३) शिखर धवन – ३८
४) नवजोतसिंग सिद्धू – ३९
५) सौरव गांगुली – ४३
दरम्यान, भारतीय संघाने दुसर्या सामन्यातही मजबूत फलंदाजी करतांना ३०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. केएल राहुलचे शतक आणि विराट कोहली व रिषभ पंत यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३३६ धावांची मजल मारली. त्यामुळे आता इंग्लंडला हा सामना जिंकून मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी ३३७ धावांचे लक्ष्य गाठावे लागेल.
महत्वाच्या बातम्या:
अवघ्या १५० चेंडूत ३५० धावा करणारा फलंदाज करतोय भारताविरुद्ध पदार्पण, जाणून घ्या त्याच्याविषयी
पुढचा विराट म्हटला गेलेला उन्मुक्त चंद अचानक गायब कसा झाला?
वनडे पदार्पणासाठी त्याने अजून काय करायला हवं? सूर्यकुमारला संधी न दिल्याने चाहत्यांचा विराटला प्रश्न