दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये असे अनेक भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बरंच क्रिकेट खेळलंय. हे खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपला सूर गवसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापैकीच एक स्टार खेळाडू म्हणजे केएल राहुल.
दुलीप ट्रॉफीमध्ये केएल राहुलचा भारत ‘अ’ संघात समावेश करण्यात आलाय. मात्र पहिल्या डावात तो काही विशेष कामगिरी करू शकला नाही. चांगली सुरुवात मिळूनही राहुल अर्धशतक न करता पॅव्हेलियनमध्ये परतला. केएल राहुलच्या बॅटमधून बऱ्याच दिवसांपासून मोठी खेळी निघालेली नाही. दुलीप ट्रॉफीमध्ये त्यानं पुन्हा एकदा निराशा केली. बांगलादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून होणाऱ्या कसोटी मालिकेचा विचार करता, राहुलचा खराब फॉर्म त्याच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल 23 धावा करून नाबाद परतला होता. तिसऱ्या दिवशी त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. राहुलनं कालच्या धावसंख्येत केवळ 14 धावांची भार टाकली. त्यानं 111 चेंडूंचा सामना करत फक्त 37 धावा केल्या. स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात राहुलला वॉशिंग्टन सुंदरनं बोल्ड केलं.
केएल राहुलनं या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यात त्यानं पहिल्या डावात 86 आणि दुसऱ्या डावात 22 धावा केल्या. मात्र, त्यानंतर दुखापत झाल्यानं तो उर्वरित चार सामन्यांमधून बाहेर पडला. यानंतर राहुलला टी20 विश्वचषकात संधी मिळाली नाही, तर श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याच्या कामगिरीवर बऱ्याच दिवसांपासून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दुसरीकडे, भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक युवा खेळाडू आपला दावा ठोकत आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी दुलीप ट्रॉफीमध्ये धावा करणं राहुलसाठी खूप महत्त्वाचे आहे. आता दुसऱ्या डावात संधी मिळाल्यावर तो काही खास कामगिरी करू शकतो का, हे पाहावं महत्त्वाचं असेल.
हेही वाचा –
बाबर आझमच्या कर्णधारपदावर धोका, लवकरच हकालपट्टी होणार! हा खेळाडू मोठा दावेदार
“टायगर अभी जिंदा है…”, UP T20 लीगमध्ये भुवनेश्वर कुमारची खतरनाक गोलंदाजी, फलंदाजांना काहीच सुचेना!
वयाच्या 17व्या वर्षी सैन्यात भरती झाला, सीमेवर पाय गमावला; अन् आता भारतासाठी पदक जिंकलं!