---Advertisement---

केएल राहुल जाणार का इंग्लंड दौऱ्यावर? दुखापतीबद्दल आलेत ‘हे’ अपडेट्स

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी काहीदिवसांपूर्वीच भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात केएल राहुलचाही समावेश करण्यात आला आहे. पण त्याचा समावेश हा त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. आता त्याच्या फिटनेसबद्दल महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

झाले असे की इंडियम प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सुरु असताना पंजाब किंग्स संघाचे नेतृत्व करत असलेल्या केएल राहुलला अपेंडिक्सचा त्रास व्हायला सुरुवात झाली. त्याला पोटात खूप वेदना होत असल्याने तात्काळ हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्याने काही सामन्यांसाठी माघार घेतली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसातच आयपीएलचा हा हंगाम कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला.

दरम्यान, राहुलची शस्त्रक्रिया झालेली असतानाही त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. आता इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार असे समोर येत आहे की १९ मे रोजी राहुल मुंबईमध्ये भारतीय संघाच्या बायोबबलमध्ये सामील होण्याची दाट शक्यता आहे. कारण अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे बरे होण्यास साधारण १५ दिवस लागतात आणि राहुलवर ३ मे रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. म्हणजेच १९ मेपर्यंत त्याच्या शस्त्रक्रियेला १२ ते १५ दिवस पूर्ण होतील. त्यामुळे भारतीय संघासाठी ही चांगली बातमी आहे की राहुल या दुखापतीतून बाहेर येत आहे आणि संघात सामील होण्यास तयार आहे.

तसेच राहुलकडे इंग्लंडसाठी रवाना होण्यापूर्वी काही दिवस असणार आहेत. भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यासाठी १४ दिवस क्वारंटाईन राहायचे आहे. त्यामुळे भारतीय संघाला अपेक्षा आहे की राहुल इंग्लंड दौऱ्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असेल.

विशेष म्हणजे शनिवारी (१५ मे) राहुलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्याने कुत्र्यांबरोबर खेळतानाचा फोटो शेअर करताना ‘हिंलींग (बरे होत आहे)’ असे कॅप्शन दिले होते.

https://www.instagram.com/p/COxlrs_g90d/

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला १८ ते २२ जून दरम्यान साऊथँम्पटन येथे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर भारताला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळायची आहे. या कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून सुरु होणार असून १४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

असा आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल (फिटनेसवर अवलंबून), वृद्धिमान साहा (फिटनेसवर अवलंबून).

राखीव खेळाडू – अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नाग्वास्वाल्ला

महत्त्वाच्या बातम्या – 

स्मिथ-वाॅर्नरचे पुनरागमन तर लॅब्यूशेनला वगळले! ‘असा’ आहे विंडीज दौऱ्यासाठीचा ऑस्ट्रेलियन संघ

पंधरा वर्षांपूर्वी श्रीसंतने मारलेला ‘तो’ षटकार आजही विसरला नाही डेल स्टेन, ट्विटरवरुन दिली ‘ही’ प्रतिक्रिया

‘अपने साथ मत जोडीये हमको’! स्वत:ची कॅलिस-वॉटसनशी तुलना करणाऱ्या विजय शंकरची नेटकऱ्यांनी घेतली शाळा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---