भारत विरुद्ध इंग्लंड संघात मंगळवारी (१६ मार्च) टी२० मालिकेतील तिसरा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात, भारताचा सलामीवीर केएल राहुल खाते खोलू शकला नाही. याचसोबत त्याच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला.
सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला राहुल
भारताकडून या सामन्यात केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी सलामी दिली. मात्र, डावाच्या तिसऱ्याच षटकात केएल राहुल मार्क वूडच्या गोलंदाजीवर शुन्य धावेवर त्रिफळाचीत झाला. त्याचबरोबर राहुलने सलग दुसऱ्या सामन्यात खातेही न खोलण्याची नामुष्की ओढवून घेतली. राहुल दुसऱ्या सामन्यातही सॅम करनच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झालेला.
नकोसा विक्रम राहुलच्या नावे
सलग दुसऱ्या टी२० सामन्यात शून्यावर बाद झाल्यामुळे राहुलच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला. तो सलग दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात शून्यावर बाद होणारा पहिला भारतीय सलामीवीर बनला आहे. आतापर्यंत भारताचा कोणताही सलामीवीर सलग दोन टी२० डावात खाते न खोलता बाद झाला नाही. भारतासाठी आत्तापर्यंत वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली यांसारख्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात सलामी दिली आहे. मात्र, कोणावरही सलग दोन डावात अशी नामुष्की आली नव्हती.
भारतीय संघाची खराब सुरुवात
तिसऱ्या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. मात्र, राहुल (०), पुनरागमन करणारा रोहित शर्मा (१५) व ईशान किशन (४) लवकर बाद झाल्याने भारताची धावसंख्या ३ बाद २४ अशी झाली होती. मार्क वूडने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन करत दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडले होते. मात्र, कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७७ धावांची खेळी करत भारताला २० षटकात ६ बाद १५६ धावांचा टप्पा गाठून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कर्णधार’ कोहली अव्वल स्थानी! अर्धशतकासह केन विलियम्सनच्या ‘या’ विश्वविक्रमाची बरोबरी
व्हिडिओ : मार्क वूडने राहुलला केले क्लीन बोल्ड, खातेही न उघडता परतला तंबूत