आयपीएलचा (IPL 2022) १५ वा हंगाम २६ मार्चपासून सुरु होणार आहे. यावर्षी ८ नव्हे तर १० संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants)संघाने आयपीएल लिलावात अनेक चांगल्या खेळाडूंना निवडले आहे. या फ्रॅंचायझीच्या पर्समध्ये जेवढे पैसे होते तेवढे फ्रॅंचायझीने आयपीएल लिलावात खर्च केले आहेत. लखनऊ संघाजवळ ५९.९८ कोटी रुपये होते. त्यांपैकी केएल राहुलवर १७ कोटी खर्च केले. तसेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टाॅयनिसला फ्रॅंचायझीने ९ कोटी रुपये आणि रवि बिश्नोईला ४ कोटी रुपयांना संघात कायम ठेवले आहे.
लखनऊ फ्रॅंचायझीकडे दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी काॅक आहे, तसेच मनीष पांडे, इविन लुईस, जेसन होल्डर, कृणाल पंड्या आणि दीपक हुडा हे खेळाडू आहेत. गोलंदाजीमध्ये आवेश खान, मार्क वुड, दुष्मंथा चमीरा हे खेळाडू आहेत. वेगवान गोलंदाज आवेश खान आणि दुष्मंथा चमीरा यांना शेवटच्या षटकांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करावी लागेल.
फिरकी गोलंदाज रवि बिश्नोईने मागील हंगामात पंजाब किंग्सकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती. यांच्याशिवाय संघात कृष्णाप्पा गौतम आणि कृणाल पंडया हे गोलंदाजसुद्धा आहेत, जे सुरुवातीच्या षटकांमध्ये गोलंदाजी करु शकतात. कृणालने मागील काही काळात मुंबईकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. मात्र तो गेल्या हंगामात फारसा लयीत दिसला नव्हता.
लखनऊ संघाकडे अष्टपैलू खेळाडूंसाठी ५ पर्याय आहेत, ज्यामध्ये कृणाल, स्टाॅयनिस, होल्डर, दीपक हुडा आणि गौतम या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी आयपीएलच्या मागील काही मोसमांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. हे सर्व खेळाडू डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये योग्य फलंदाजी करू शकतात.
केएलसोबत सलामीला क्विंटन डी काॅक येऊ शकतो. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मनिष पांडे येऊ शकतो, जो मागील हंगामात काही खास कामगिरी करु शकला नाही. तसेच मनन वोहराची सुद्धा सध्या हीच अवस्था आहे. संघात अनेक धडाकेबाज फलंदाज आहेत परंतु शेवटपर्यंत उत्तम खेळी करु शकतील, असे फलंदाज कमी आहेत. ही जबाबदारी सलामीवीर डी काॅक आणि राहुलवरच असणार आहे.
लखनऊ सुपर जायंट्स संघाचा पहिला सामना २८ मार्चला गुजरात टायटंसविरुद्ध होणार आहे. संघ दुसऱ्या सामन्यात ३१ मार्चला सीएसके संघासोबत भिडणार आहे, तसेच ४ एप्रिलला हैद्राबादसोबत सामना पार पडणार आहे. लखनऊ संघ ७ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स तर १० एप्रिलला राजस्थान राॅयल्स आणि १६ एप्रिलला मुंबई इंडियन्ससोबत भिडणार आहे. १९ एप्रिलला लखनऊ आरसीबी, २४ एप्रिलला मुंबई इंडियन्स, २९ एप्रिलला पंजाबसोबत भिडणार आहे. १ मे रोजी दिल्ली तर ७ मे रोजी कोलकाता आणि १० मे रोजी गुजरात या संघांसोबत लखनऊ संघ सामने खेळताना दिसणार आहे. लखनऊचा १५ मे रोजी राजस्थान आणि १८ मे रोजी कोलकातासोबत सामना पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
छोटा पॅक बडा धमाका! तुम्हाला पार्थिव पटेलबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी माहितीये का?
पीटी शिक्षक ते जगातील एक नंबरचा गोलंदाज असा प्रवास करणारा सॅम्युअल बद्री
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेलने खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात