केएल राहुलसाठी आयपीएल 2024 चा हंगाम काही खास राहिला नव्हता. राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. संघ गुणतालिकेत 7व्या स्थानी राहिला. महत्त्वाचं म्हणजे, हैदराबादविरुद्धच्या सामन्यात लखनऊचा 10 गडी राखून पराभव झाल्यानंतर संघमालक संजीव गोयंका यांचा राहुलशी वाद झाला होता. आता आयपीएल 2025 पूर्वी कर्नाटकच्या या स्टार फलंदाजानं स्पर्धेतील काही नकारात्मक बाबींवरून पडदा उघडला आहे.
राहुलनं एका पॉडकास्टवर आयपीएलबाबत दिलखुलास चर्चा केली. राहुलनं सांगितलं की, आयपीएल मधील संघांचे मालक व्यावसायिक पार्श्वभूमीचे आहेत आणि ते रिसर्च करून टीम निवडतात. राहुलच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला डेटावर आधारित चांगले खेळाडू मिळू शकतात, परंतु त्यांचं संपूर्ण वर्ष खराब जाऊ शकतं. खेळात कधी ना कधी सर्वच खेळाडूंचे वाईट दिवस आले आहेत.
राहुल म्हणाला, “संघ मालक व्यावसायिक पार्श्वभूमीतून येतात. ते रिसर्च करतात आणि संघ निवडतात. परंतु तुम्ही प्रत्येक सामना जिंकू शकाल याची खात्री नसते. डेटानुसार तुम्हाला सर्वोत्तम खेळाडू मिळू शकतात, परंतु त्यांचं वर्ष खराब असू शकतं. खेळात प्रत्येक खेळाडूचा वाईट दिवस येऊ शकतो.”
लखनऊच्या मालकाशी झालेल्या वादानंतर बातम्या आल्या आहेत की केएल राहुल आगामी आयपीएल हंगामापूर्वी संघाची साथ सोडू शकतो. आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, जर राहुलनं लखनऊची साथ सोडली, तर तो त्याची जुनी फ्रँचायझी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये परत येऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
केएल राहुलनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 132 सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 45.47 ची सरासरी आणि 134.61 च्या स्ट्राइक रेटनं 4683 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावे 4 शतकं आणि 37 अर्धशतकं आहेत.
हेही वाचा –
अनेक गोलंदाजांचे आकडे तिसऱ्या क्रमांकावरील बाबर आझम पेक्षा चांगले, आईसीसी रँकिंगवर विश्वास तरी कसा ठेवायचा?
पाकिस्तान क्रिकेट रसातळाला! 3 महिन्यांत झाले 3 लाजिरवाणे पराभव
कॅरेबियन पॉवर! रोमॅरियो शेफर्डसमोर वर्ल्ड कप उपविजेता संघ ढेपाळला