कोरोनाच्या संकटात होय-नाही म्हणता म्हणता अखेर १९ सप्टेंबरला आयपीएलच्या १३ व्या हंगामाचं बिगूल वाजलं आणि ही स्पर्धा मोठ्या उत्साहानं सुरु झाली. तशी स्पर्धा सुरु होण्याआधीच नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात चर्चाही रंगल्या, कोणते संघ कसे, कोणत्या संघाची काय कामगिरी, कोण किती कमकुवत आणि कोण किती मजबूत. यातही किंग्स इलेव्हनच्या संघानं लक्ष वेधून घेतलं होतं. कारणही तशीच होती. त्यांनी पुन्हा केलेली संघबांधणी, सपोर्ट स्टाफमधील बदल, कर्णधार बदल अशी अनेक कारणं त्याला होती. त्यात ख्रिस गेलसारखा खेळाडू संघात आहे म्हटल्यावर विषयच संपतो. पण… स्पर्धा सुरु झाली आणि पंजाब संघातील पक्के दुवे सांगणारे त्यांचे कच्चे दुवे सांगू लागला. मात्र या सर्वांनाही पुरुन उरला तो म्हणजे या संघाचा सेनापती अर्थात कर्णधार केएल राहुल.
केएल राहुलने पहिल्या सामन्यापासून जे आयपीएल गाजवायला सुरुवात केली त्याच्यात अजूनही खंड पडलेला नाही. बरं थोडं त्याच्या आकडेवारीकडे जाऊ या. या पठ्ठ्याने ९ सामन्यातच ५०० धावांचा जादूई आकडा पार केला आहे. ९ सामन्यात १ शतक आणि ५ अर्धशतके. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, सामने खेळला ९ पण त्यातील ६ सामन्यात तर त्याने ५० चा आकडा पार केला आहे. म्हणजे त्यान सातत्य असावं तर असं, हे म्हणायला भाग पाडलं. उर्वरित ३ सामन्यात त्याची कामगिरी होती ११, १७ आणि २१ धावा. आणखी एक खास गोष्ट म्हणजे २०१८, २०१९ आणि २०२० अशा सलग ३ आयपीएल हंगामात त्याने प्रत्येक वेळी ५०० धावांचा आकडा पार केला आहे; आणि सलग तीन आयपीएल हंगामात ५०० धावा करणारा तो पहिलाच भारतीय आहे. इतकी अफलातून फलंदाजी त्याने केली आहे.
एवढं असूनही त्याने गेलसारखं कधी मी किती मोठी कामगिरी केलीये असं बोलून दाखवलं नाही. अर्थात युनिवर्सल बॉस असणाऱ्या ख्रिस गेलबद्दल आदर आहेच. पण सांगण्याचा उद्देश असा की राहुल शांततेत त्याचं काम करतोय. दोन वर्षांपूर्वीच्या राहुलला आठवलं तर लक्षात येईल एक काळ असा होता, की सर्वात जास्त टिका होणारा तो भारतीय संघातील खेळाडू होता. त्याला संघात स्थान का दिलं जातंय, असेही प्रश्न विचारले गेले. पण त्यावर त्याने तेव्हाही कधी प्रतिक्रिया दिली नाही. फक्त तो त्याचं काम करत राहिला. आज त्याला संघात घ्या, असं म्हटलं जातयं. ते पण फक्त फलंदाज म्हणून नाही तर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून, इतकी त्याची कामगिरी बोलकी आहे. बरं मुळ मुद्दा असा की केएल राहुल सध्या पंजाबकडून सेनापती म्हणून खरोखरं एकटाच झुंज देत आहे. त्याला अधून मधून मयंक अगरवाल, मोहम्मद शमी यांची साथ मिळते. पण ती अपूरी पडत आहे. अखेर युद्धात विजय हवा असेल एक एकजूट असावीच लागते. तसं क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे म्हटल्यावर सांघिक कामगिरी महत्त्वाचीच. त्यात एक, दोन खेळाडू खेळून कसे चालेल. सामना एखाद-दोन खेळाडू जिंकून देऊही शकतात पण स्पर्धा जिंकण्यासाठी सांघिक कामगिरीचीच गरज असते.
पंजाबच्या सांघिक कामगिरीकडे पहायचं झाल्यास लक्षात येईल त्यांचे सामने म्हटलं की फक्त केएल राहुल आठवतोय आणि अधून मधून कधीतरी मयंक, शमी, पुरन हे खेळाडू. पण एकत्र अशी कामगिरी नाहीच. त्यामुळे पंजाबने ९ सामन्यात फक्त ३ सामने जिंकले आहेत. बरं यातही विजय मिळवलेल्या तिन्ही सामन्यात सामनावीर ठरलेला एकमेव खेळाडू म्हणजे केएल राहुल. यावरुन लक्षात येईल की राहुल या एकमेव खेळाडूवर संघ कितपत विसंबलेला असेल. याच्याच उलट उदाहरण आहे, दिल्ली कॅपिटल्सचं, जो संघ सध्या अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनी ९ सामन्यांतील ७ सामने जिंकलेत आणि या सातही सामन्यात सामनावीर ठरलेले ७ वेगवेगळे खेळाडू होते. म्हणजे यावरुन कळते स्पर्धेत टिकून रहायचं असेल तर सांघिक कामगिरी होणे किती महत्त्वाचे आहे.
त्यात पंजाब संघासाठी डोकेदुखी ठरली ती म्हणजे स्टार परदेशी खेळाडू सपशेल अपयशी ठरल्याने. ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कॉट्रेल या खेळाडूंना कोट्यावधींची बोली लावत पंजाबने संघात घेतलं. मॅक्सवेलच्या क्षमतेवर शंका नाही, मात्र तो आयपीएलमध्ये अपयशी ठरतोय, हे नक्की. त्याचं अपयश संघाला भोवत आहे. त्याच्या न खेळण्यानं संघाला समतोलही राखण्यात समस्या येत आहेत. त्यातही ख्रिस गेल पहिल्या ७ सामन्यांत आजरपणामुळे खेळलाच नाही. त्याचाही फटका पंजाब संघाला जोरदार बसला. मयंक, राहुल चांगली सुरुवात देत असले तरी मधली फळी अनुभव नसल्याने प्रत्येकवेळी गडगडली. कारण मॅक्सवेल फेल जात होता. पूरन एकटा कितीवेळा तारणार हा प्रश्न. गोलंदाजीत तर रवी बिश्नोई आणि शमी शिवाय कोणाचं नाव पुढे आलंच नाही. त्यामुळे संघाची सांघिक कामगिरी काय असा प्रश्न उपस्थित होणे, सहाजिकच होतं.
त्यातूनही सपोर्टस्टाफमध्ये मोठ्या नावांची कमतरता नाही. अनेकांना ही नावं ऐकूनही आश्चर्य वाटेल इतके दिग्गज सपोर्ट स्टाफमध्ये आहेत. संघाचा क्रिकेट संचालक आणि मुख्य प्रशिक्षक आहे, अनिल कुंबळे, जो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. फलंदाजी प्रशिक्षक आहे, वासिम जाफर, जो रणजीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आहे, जॉन्टी ऱ्होड्स, ज्याला आजही जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हटलं जातं. सहाय्यक प्रशिक्षक आहे झिम्बाब्वेचा दिग्गज अँडी फ्लॉवर. असे असताना देखील संघाची कामगिरी इतकी वाईट होतं आहे. अर्थात संघाच्या वाईट कामगिरीला कारणंही अनेक आहेत. अंतिम ११च्या संघात झालेले सातत्याने बदल एक मोठे कारण.
तसेच यामुळे कुठेतरी राहुल फलंदाज म्हणून यशस्वी होत असला तरी कर्णधार म्हणून अपयशी ठरतोय का? असाही प्रश्न निर्माण होत आहे. कारण बऱ्याचदा त्याने घेतलेल्या निर्णयांवर आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. राहुलचा तसा कर्णधार म्हणून हा आयपीएलचा पहिलाच हंगाम आहे, त्यामुळे कदाचित त्याच्यावर कर्णधार म्हणून दबाव असावा, ज्याचा परिणाम संघावर होत असेल. पण यातून एक गोष्टही लक्षात घ्यावी लागेल राहुल जरी चांगला फलंदाज असला तरी तो कर्णधार म्हणून तितका सक्षम आहे का याची दखल पंजाब संघाला घ्यावी लागेल. कारण राहुलकडे बरेच जण भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणूनही पाहातात, मात्र जर राहुल आयपीएलमध्ये नेतृत्व करण्यात अपयशी ठरला तर त्याला भारताचा कर्णधार करण्याचा परिस्थिती उद्भवली तर दोनवेळा विचार केला जाऊ शकतो.