टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या 35व्या सामन्यात बुधवारी (दि. 2 नोव्हेंबर) भारत आणि बांगलादेश संघ आमने-सामने होते. ऍडलेड मैदानावर झालेल्या या सामन्यात केएल राहुल हा चर्चेचा विषय ठरला. राहुलने आधी फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. तर, क्षेत्ररक्षणात ही चमक दाखवताना मोक्याच्या क्षणी एक धावबाद केला. मागील काही काळापासून अपयशी ठरत असलेल्या राहुलच्या या सामन्यातील यश भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. मात्र, या सामन्याआधी त्याने भारताचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याच्याकडून टिप्स घेतल्या होत्या. त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर आता स्वतः राहुलने खुलासा केला आहे.
विश्वचषक सुरु झाल्यापासून राहुल हा सातत्याने अपयशी ठरत होता. पहिल्या तीन सामन्यात त्याने अनुक्रमे 4,9 व 9 अशा भावा बनवलेल्या. बांगलादेश विरुद्ध मात्र तो तुफान फटकेबाजी करताना दिसून आला. सुरुवातीला संथ खेळल्यानंतर त्याने आपले गिअर बदलत 31 चेंडूवर अर्धशतक ठोकले. यात 3 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता.
राहुल या सामन्यात चमकला असला तरी सामन्याच्या एक दिवस आधी सराव सत्रात तो भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली यांच्याकडून मार्गदर्शन घेताना दिसलेला. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला. त्या व्हिडिओबाबत आता स्वतः राहुलने खुलासा केला. तो म्हणाला,
“आम्ही चर्चा करत होतो की, यावेळी ऑस्ट्रेलियातील परिस्थिती कशाप्रकारे वेगळी आहे. आम्ही यापूर्वी देखील येथे खेळलो असून, त्यापेक्षा यावेळी परिस्थिती काहीशी कठीण दिसून येतेय. मानसिकतेबाबतही आमची चर्चा झाली. एकमेकांना सहकार्य करण्याविषयी आम्ही बोलत होतो.”
राहुल हा भारतीय संघाचा उपकर्णधार असून, त्याचा फॉर्म भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात फायदेशीर ठरू शकतो.
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशला कमी फरकाने धूळ चारण्यात भारत आहे ‘मास्टर’, 2016मध्येही केलीय खास कामगिरी
बांगलादेशविरुद्धचा सामना भारताने जिंकल्यानंतर पाकिस्तानला दणका! वाचा नक्की कसे झाले नुकसान