---Advertisement---

वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण करणारी ‘दिप्ती शर्मा’

---Advertisement---

‘छोटा पॅकेट बडा धमाका’ ही उक्ती अगदी चपखल बसते ती भारतीय संघातील महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्माला. काही दिवसांपूर्वीच तिला अर्जून पुरस्कारही जाहिर झाला आहे. आज तिचा २४ वा वाढदिवस आहे.

अष्टपैलू क्रिकेटपटू असलेल्या दिप्तीचा जन्म आग्रा, उत्तर प्रदेश येथे २४ ऑगस्ट १९९७ ला झाला. ती तिच्या ७ भावंडांमधील सर्वात धाकटी. तिचा मोठा भाऊ सुमीत क्रिकेट खेळायचा. त्यामुळे तीला सुद्धा क्रिकेटमध्ये आवड निर्माण झाली. ती सुरुवातीला तिच्या भावाचे किटही वापरायची. तिच्या भावाने २२ वर्षांखालील उत्तर प्रदेश संघाचे सीके नायडू ट्रॉफीमध्येही प्रतिनिधित्व केले आहे.

जेव्हा दिप्ती ९ वर्षांची होती तेव्हा तिच्या भावाने तिला क्रिकेट शिकवावे यासाठी तिच्या वडिलांकडे हट्ट केला होता. तिचे वडिल भारतीय रेल्वेमधून बूकींग सुपरवायझर म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनीही आपल्या मुलीचा हा हट्ट पूर्ण केला. मग एके दिवशी सुमीतने तिला तो सराव करत असलेल्या एकलव्य स्पोर्ट्स स्टेडियममध्ये नेले. त्यावेळी तिथे असलेल्या भारतीय माजी महिला क्रिकेटपटू हेमलता काला दिप्तीचा एक थ्रो पाहून प्रभावित झाल्या. दिप्तीने पहिल्याच प्रयत्नात थेट स्टंपवर चेंडू फेकला होता. त्यानंतर काला यांनी सुमीतला बोलावून घेतले आणि बॉयकटमध्ये असलेल्या ‘या’ मुलीबद्दल चौकशी केली आणि त्यांनी त्याला सांगितले तिचे खेळणे असेच चालू राहूदे, एक दिवस ती नक्कीच भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करेल. मग काय दिप्तीला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

हळूहळू ती क्रिकेटमध्ये प्रगती करत होती. पण काही केले तरी राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिला संघात स्थान मिळेना. पण अखेर तिच्यातील अष्टपैलू कामगिरीने निवडकर्त्यांचे आणि रिता डे यांचे लक्ष वेधले. पुढे माजी भारतीय क्रिकेटपटू असलेल्या रिता यांनी मार्गदर्शन दिले. पुढे ती देशांतर्गत आणि भारतीय अ संघाकडून चांगली कामगिरी करत राहिली. त्यामुळे तिच्याकडे नंतर दुर्लक्ष करणे शक्यच नव्हते, अखेर तिला वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. तिनेही ही संधी दोन्ही हातांनी पकडत संघातील स्थान पक्के केले. तिने २०१४ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात ३५ धावा देत २ विकेट्स घेतल्या. यातील एक विकेट तिने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत घेतली होती.

तिने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये २०१६ ला पदार्पण केले. तेही विश्वचषकातून ऑस्ट्रेलियाविरुद्ध. या सामन्यात तिने नाबाद १३ धावा केल्या आणि १ विकेटही घेतली. त्यानंतरचे वर्ष तिच्यासाठी अधिक अविस्मरणीय ठरले. तिने २०१७ ला आयर्लंड विरुद्ध चक्क १८८ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांचा समावेश असलेल्या महिलांच्या चतुष्कोणीय मालिकेत खेळतानाही तिने हा पराक्रम केला होता. तिने केवळ १६० चेंडूत २७ चौकार आणि २ षटकारांसह १८८ धावा केल्या होत्या. दुर्दैवाने, तिची ही खेळी ४६ व्या षटकात संपुष्टात आली. नाहीतर ती महिला वनडे सामन्यात ती भारताची पहिली द्विशतकवीर बनू शकली असती. पण असे असले तरी ती भारतीय महिला क्रिकेटमध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारी क्रिकेटपटू आहे. तसेच ती १५० धावांचा टप्पा पार करणारी तिसऱ्या क्रमांकाची युवा क्रिकेटपटूही ठरली.

https://twitter.com/ICC/status/1032855017496227840

एवढेच नाही तर याच सामन्यात तिने पुनम राऊतसह एक मोठा विश्वविक्रमही रचला. तिने आणि राऊतने सलामीला खेळताना ३२० धावांची भागीदारी रचली. यावेळी राऊतने १०९ धावा केल्या होत्या. ही महिला वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च धावांची भागीदारी आहे.

तसेच २०१७ ला भारतीय महिला संघाला विश्वचषकात अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यातही तिचा मोलाचा वाटा होता. त्या स्पर्धेत तिने ९ सामन्यात २१६ धावा केल्या होत्या. तसेच १२ विकेट्सही घेतल्या होत्या.

दिप्तीने नेहमीच आत्तापर्यंत तिच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. ती केवळ एक चांगली फलंदाज किंवा गोलंदाज नाही तर एक चांगली क्षेत्ररक्षकही आहे. ती सध्या महिला वनडे क्रमवारीत अष्टपैलूंच्या यादीत चौथ्या, तर टी२०मध्ये ५ व्या क्रमांकावर आहे. एवढेच नाही तर टी२० मध्ये गोलंदाजांच्या यादीतही ती ६ व्या क्रमांकावर आहे. आजपर्यंत तिने १ कसोटी, ६१ वनडे आणि ५४ टी२० सामने खेळले आहेत. वनडे सामन्यात तिने १५४१ धावा केल्या असून ६८ बळी देखील मिळवले आहेत. तर टी२० सामन्यात ४७० धावा आणि ५६ बळी घेतले आहेत.

ट्रेंडिंग लेख –

एकाच दिवशी जन्मलेल्या ‘या’ रणरागिणींचा भारतीय क्रिकेटमध्ये दबदबा, एकीच्या नावे तर विश्वविक्रमाची नोंद

धोनीच्या षटकाराने एका पाकिस्तानी क्रिकेटपटूची प्रेमकहाणी सुरु होण्याआधीच आली होती संपुष्टात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---