ऑस्ट्रेलिया संघाने २००१ साली केलेला भारत दौरा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दौरा म्हणून ओळखला जातो. मॅच फिक्सिंगच्या, भारतीय क्रिकेटला कलंकित करणार्या घटनेतून सावरून भारतीय संघाने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा सलग १६ कसोटी विजयांचा विजयरथ कोलकत्तातील ईडन गार्डनवर रोखला होता. पुढे, चेन्नई कसोटी जिंकत भारताने ऐतिहासिक मालिका विजय साजरा केला. हरभजन सिंह, राहुल द्रविड तसेच व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या विश्वविक्रमी व अविस्मरणीय खेळीसाठी ही मालिका ओळखली जाते. परंतू, ही मालिका जिंकून देण्यात एका पदार्पणवीर यष्टीरक्षक फलंदाजादेखील खारीचा मात्र अत्यंत महत्वपूर्ण वाटा आहे. तो यष्टीरक्षक फलंदाज म्हणजे मुंबईकर समीर दिघे.
अनुभवी स्टीव वॉ समोर होती सौरव गांगुलीची खरी ‘कसोटी’….
सलग १५ कसोटी विजय मिळवत स्टीव वॉच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघ भारतीय भूमीवरील मोहीम फत्ते करण्यासाठी आला होता. दौऱ्याची सुरुवात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेने मुंबईत होणार होती. तसं पाहायला गेलं तर, भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ तोलामोलाचे होते. मात्र, कप्तानीच्या मोर्चावर भारताकडे होता नव्याने कर्णधार झालेला सौरभ गांगुली तर ऑस्ट्रेलियाकडे दिग्गज मुरलेला स्टीव वॉ. फलंदाजी दोघांची समसमान व दिग्गजांनी भरलेली होती. पण, गोलंदाजीच्या विभागात ऑस्ट्रेलियाकडे ग्लेन मॅकग्रा, जेसन गिलेस्पी, शेन वॉर्न तर भारताकडे अनुभवी जवागल श्रीनाथ व व्यंकटेश प्रसाद सोडल्यास झहीर खान, हरभजन सिंह, निलेश कुलकर्णी, राहुल संघवी अशी सगळी तरुण मंडळी होती.
अखेर दौऱ्याच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपल्या कौशल्याची चमक दाखवलीच….
मुंबईतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने जगज्जेत्यांना साजेसा खेळ केला. शेन वॉर्नच्या फिरकी पुढे भारताचा डाव १७६ धावांवर संपला. वॉर्नने सर्वाधिक चार बळी मिळवले तर मॅकग्राने तीन बळी आपल्या नावे केले. भारताकडून एकमेव अर्धशतक सचिन तेंडुलकरने ठोकले. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात मॅथ्यू हेडन व ॲडम गिलख्रिस्टच्या दमदार शतकांच्या जोरावर ३४९ धावा चोपल्या. भारताकडून पदार्पण करणारा हरभजन सिंहने ऑस्ट्रेलियाचे चार गडी बाद केले होते.
ऑस्ट्रेलियाला १७३ धावांची आघाडी मिळाली. भारताचा दुसरा डावही ऑस्ट्रेलियाच्या शिस्तबद्ध माऱ्यामुळे २१९ च्या पुढे जाऊ शकला नाही. पुन्हा एकदा भारताकडून सचिनने सर्वाधिक ६५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मिळालेले ४७ धावांचे आव्हान मॅथ्यू हेडन व मायकल स्लेटर यांनी सात षटकात गाठले. ऑस्ट्रेलियाने आपला सलग १६ वा कसोटी विजय साजरा केला होता.
‘ईडन’वर सुरू झाला ऐतिहासिक सामना.. हरभजनने दाखवली आपल्या फिरकीची जादू…
पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर, ऑस्ट्रेलियाचा संघ आत्मविश्वासाने भरला होता. इडन गार्डन्सवरील दुसऱ्या सामन्यात, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पुन्हा एकदा धमाका करत ४४५ धावा फलकावर लावल्या. कर्णधार स्टीव वॉने शतक तर हेडनने ९७ धावांची आक्रमक खेळी केली. भारताकडून पुन्हा एकदा युवा हरभजन सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला त्याने ७ बळी टिपले.
प्रत्युत्तरात, भारताचा डाव १७१ वर गडगडला. ग्लेन मॅकग्राच्या भेदक गोलंदाजीपुढे फक्त लक्ष्मण टिकू शकला त्याने ५९ धावांची खेळी केली. भारताला फॉलोऑन मिळाल्यानंतर मात्र, द्रविड-लक्ष्मण या जोडीने इतिहास रचत ६५७ धावांपर्यंत भारताचा दुसरा डाव नेला. जवळपास हरलेल्या सामन्यात, भारताने पुनरागमन केले होते. हरभजन सिंहने पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवत सहा बळी मिळवून भारताला १७१ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या विजयासोबतच, भारताने ऑस्ट्रेलियाचा १६ कसोटी विजयांची मालिका खंडित केली.
चेन्नईच्या ‘चेपॉक’वर भारताचा संघात अनपेक्षित बदल अन् मुंबईकर समीर दिघेला संधी…
मालिकेतील निर्णायक आणि अंतिम सामना चेन्नईतील चेपॉक मैदानावर होणार होता. ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास शिखरावर पोहोचला होता. मागील दोन सामन्यात इतर फलंदाजांनी ठीकठाक कामगिरी केली असली तरी, यष्टीरक्षक नयन मोंगिया एकदाही दुहेरी धावसंख्या गाठू शकला नव्हता. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याच्या जागी समीर दिघेला पदार्पणाची संधी दिली. तसेच, व्यंकटपती राजूच्या जागी दुसरा मुंबईकर साईराज बहुतुले याला संघात समाविष्ट केले गेले.
काहीही करून सामना व मालिका जिंकण्याच्या इर्षेने मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन सलामीवीर मॅथ्यू हेडनने भारतीय गोलंदाजांवर हुकुमत गाजवायला सुरुवात केली. वॉ बंधूंनी त्याची योग्य साथ दिली. हेडने धमाकेदार द्विशतक मारले. पॉंटिंग, गिलख्रिस्ट व तळातील फलंदाजांनी कच खाल्ल्यामुळे हेडनच्या द्विशतकानंतरही ऑस्ट्रेलियाचा डाव ३९१ पर्यंत मर्यादित राहिला. मालिकेत स्वप्नवत कामगिरी करत असलेल्या हरभजनने पुन्हा सात बळी आपल्या नावे केले.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाला भारताचे चोख प्रत्युत्तर…
भारताने ऑस्ट्रेलियाच्या ३९१ धावांचे चोख प्रत्युत्तर दिले. शिवसुंदर दास, सदगोपण रमेश, लक्ष्मण व द्रविड यांनी अर्धशतके ठोकली. पुन्हा एकदा भरवशाच्या सचिन तेंडुलकरने शतक झळकावले. भारताने ११० धावांची आघाडी घेत ५०१ धावा धावफलकावर लावल्या. हरभजनने मालिकेतील सर्वात्तम कामगिरी ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावात नोंदवली. त्याने ऑस्ट्रेलियाचे ८ गडी तंबूत पाठवले. ऑस्ट्रेलियाकडून फक्त मार्क वॉ अर्धशतकाची वेस ओलांडून शकला. ऑस्ट्रेलियाचा संघ २६४ धावांवर सर्वबाद झाल्याने भारताला विजयासाठी १५५ धावांचे लक्ष्य मिळाले.
दुसऱ्या डावात भारताला अवघे १५५ धावांचे आव्हान अन् चेपॉकवर रंगू लागला ऐतिहासिक सामना…
शिवसुंदर दास झटपट बाद झाल्यानंतर, रमेश व लक्ष्मण जोडीने ५८ धावांची भागीदारी केली. रमेश बाद झाल्यानंतर, लक्ष्मणच्या साथीला सर्वात अनुभवी सचिन आला. दोघांनी भारताची धावसंख्या शंभरापार नेली. गिलेस्पीने सचिनला बाद केले आणि भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. सचिन पाठोपाठ गांगुली व द्रविड माघारी परतले. लक्ष्मणच्या साथीला आपला पहिला सामना खेळणारा समीर दिघे आला. दोघांनी १३ धावांची भर घातली असतानाच, लक्ष्मणला कॉलिन मिलरने मार्क वॉच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. तेव्हा भारताची धावसंख्या होती ६ बाद १३५. भारताला विजयासाठी अजूनही २० धावांची गरज होती. साईराज बहुतुले आल्या पावली माघारी परतला. आता सामना जिंकून देण्याची सर्वस्वी जबाबदारी समीर दिघेवर आली होती.
पदार्पणवीर मुंबईकर समीर दिघेने पेलली संघाची जबाबदारी अन् गाजवले मैदान…
समीर दिघे गेली १२ वर्ष देशांतर्गत क्रिकेट गाजवत होता. मुंबईसाठी यष्टीरक्षणाची जबाबदारी त्याने यशस्वीरित्या सांभाळली होती. १९९९ च्या रणजी विजेत्या मुंबई संघाचा तो कर्णधार होता. राष्ट्रीय संघात निवड होत नसल्याने तो शिक्षणासाठी अमेरिकेला गेला आणि इकडे २००० मध्ये त्याची भारतीय एकदिवसीय संघात निवड झाली. मुंबईकर सचिन तेंडुलकर कर्णधार असल्याने ही निवड केली गेली, असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. मात्र, समीरची कामगिरी उजवी होती. तिशी पार केल्यानंतर तो भारतीय संघात दाखल झाला होता. देशांतर्गत क्रिकेटच्या अनुभवाचा फायदा त्याला या आंतरराष्ट्रीय सामन्यात होणार होता.
काळजाचा ठोका रोखून धरणारा सामना अन् समीर दिघेने संघाल इतिहासाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले…
बहुतुले बाद झाल्यानंतर, फलंदाजीला आलेल्या झहीर खानला स्ट्राइक न देता, दिघेने गिलेस्पी व मॅकग्रा यांच्याविरूध्द धाडसाने फलंदाजी केली. दोन्ही गोलंदाजांना त्याने चौकार मारले. झहीरने देखील चौदा चेंडू खेळून काढले, मात्र त्याला खाते खोलता आले नाही. अखेर, मॅकग्राने झहीरचा बचाव भेदला. भारताला जिंकण्यासाठी अजूनही चार धावा हव्या होत्या आणि दोन गडी शिल्लक होते. दिघे यांनी दोन धावा घेत, सामना जिंकण्याच्या भारताच्या आशा पल्लवित ठेवल्या. अखेरीस, गिलेस्पीच्या चेंडूवर हरभजनने दोन धावा काढत भारताला विजय मिळवून दिला.
संपूर्ण मालिका गाजवणारा हरभजन ठरला ऐतिहासिक धावेचा मानकरी, मात्र संघाचा खरा आधार ठरला तो समीर दिघेच
संपूर्ण मालिका गाजवलेल्या हरभजनच्या बॅटमधून अखेरच्या धावा येणे, एकप्रकारे नशिबाने रचलेल्या खेळाचे संकेत होते. भारताने ऐतिहासिक मालिका विजय साजरा केला मात्र, अखेरच्या सामन्यातील चौथ्या डावात महत्वपूर्ण २२ धावांची खेळी करणारा समीर दिघे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या हृदयात कायमचे अजरामर झाला.