भारताचे माजी क्रिकेटपटू आणि युवराजसिंग याचे वडील योगराज सिंह यांना महेंद्रसिंग धोनीविरुद्ध केलेल्या वक्तव्यामुळे बहुतेक लोक त्यांना ओळखतात. या व्यतिरिक्त ते क्रिकेटच्या क्षेत्रात कार्यरत असून बर्याच पंजाबी चित्रपटांमध्येही काम करताना दिसले आहेत. परंतु, खेळापेक्षा वादग्रस्त संभाषणामुळे ते जास्त चर्चेत राहिले आहेत.
साल 1958 मध्ये 25 मार्च रोजी त्यांचा जन्म झाला होता. चंदीगढ़मध्ये जन्मलेल्या योगराज यांचे पूर्ण नाव योगराज सिंह भागसिंग भुंडेल असे आहे. ते उजव्या हाताचे मध्यम वेगवान गोलंदाज होते. ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणा आणि पंजाब या दोन्ही संघाकडून खेळले. पण त्यांची कारकीर्द फार काळ टिकली नाही. 1976-77 मध्ये त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 1984-85 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
पण या अल्प कालावधीतही ते भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविण्यात यशस्वी झाले. साल 1980-81 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या मालिकेसाठी भारतीय संघात त्यांची निवड झाली होती. त्यांच्या निवडीमुळे अनेकांना आश्चर्य वाटले. या दौर्यावर त्यांना एक कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळायला मिळाले. त्यांचा कसोटी पदार्पण सामना न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनमध्ये होता. यात त्यांना एकच विकेट मिळली होती. ही विकेट जॉन राईटचा त्रिफळा उडवून मिळवली होती. पहिल्या कसोटीत त्यांनी 63 धावा दिल्या आणि 10 धावा केल्या. या सामन्यानंतर त्यांची कसोटी कारकीर्द संपुष्टात आली. या दौर्यावर ते सात प्रथम श्रेणी सामन्यांमध्येही खेळले यात त्यांना फक्त 13 विकेट मिळाल्या.
तसेच योगराज यांनी भारताकडून सहा एकदिवसीय सामनेही खेळले. या सहापैकी चार सामने ते न्यूझीलंडविरूद्ध खेळले आणि त्यानंतर दोन सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले. या सामन्यांत त्यांनी चार विकेट्स घेतल्या. 44 धावा देऊन दोन बळी मिळवणे ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याच वेळी, ते सहा सामन्यांच्या चार डावांमध्ये एकच धाव करू शकले. योगराज यांनी प्रथम अ गटातील सामनेही खेळले. पण इथेही त्यांचा खेळ सामान्य होता. त्यांना प्रथम श्रेणीमध्ये 66 विकेट्स मिळाल्या त्याचबरोबर अ गटामध्ये 13 विकेट मिळाल्या.
यानंतर दुखापतींमुळे लवकरच त्यांची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली. अशा परिस्थितीत ते पंजाबी चित्रपटसृष्टीकडे वळले. येथे त्यांनी बर्याच मोठ्या चित्रपटांमध्येही काम केले.
नंतरच्या काही वर्षांत बहुतेक वादांमुळे ते चर्चेत आले होते. धोनीबद्दल अनेकदा टीका करताना ते दिसून आले. युवराजची कारकीर्द धोनीमुळे फार काळ टिकली नाही, धोनीमुळेच त्याला 2015 च्या विश्वचषक खेळता आला नाही,असा आरोप त्यांनी केला होता. तसेच एक दिवस धोनी गरीब होईल आणि त्याला भीक मागावी लागेल, असेही ते म्हणाले होते. 2014 मध्ये कार पार्किंगच्या वादातून योगराज यांना अटक करण्यात आली होती. अशा अनेक घटनांमुळे गेल्या काही वर्षांत ते चर्चेत राहिले.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: भारतीय क्रिकेटचा ‘दबंग’ क्रिकेटपटू ‘केदार जाधव’
IPL 2022 : चेन्नई आणि कोलकाता संघांमध्ये रंगणार उद्घाटन सामना, अशी असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन