मुंबई क्रिकेट असोशिएशनने आजवर जितके खेळाडू भारतीय क्रिकेट संघाला दिले आहेत, तितके क्वचितच इतर कुठल्या असोशिएशनने दिले असतील. अगदी सुरुवातीच्या काळात विजय हजारे, विजय मर्चंट हे दोघे खेळाडू भारतीय फलंदाजीचा कणा होते. नंतरच्या काळात पॉली उम्रीगर, सुनील गावसकर यांनी आपल्या खेळाने भारतीय क्रिकेट संघाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले.
“आधुनिक क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर हा तर जगातील एक सर्वोत्तम फलंदाज बनला आणि क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईतही बनला. सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून खेळलेले रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ हे भारतीय संघाचे नियमित सदस्य आहेत.”
या सर्व खेळाडूंच्या यादीत मुंबई क्रिकेट संघटनेने भारतीय संघाला दिलेल्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत ‘माधव आपटे’ हे देखील एक नाव समाविष्ट आहे. विजय हजारे, रुसी मोदी, विनू मंकड, पॉली उम्रीगर यांच्यासमवेत खेळलेले माधव आपटे भारतीय क्रिकेटमध्ये कमालीची प्रतिभा असून मर्यादित संधी मिळालेले क्रिकेटपटू म्हणून ओळखले जातात.
शिक्षकांनी माधव आपटे यांच्यातील गुण हेरुन त्यांना क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहित केले…
माधव आपटे यांचा जन्म मुंबईतील एका अत्यंत सधन कुटुंबात झाला होता. त्यांचे आजोबा, वडील हे साखर कारखाने आणि कपड्याच्या मिलचे मालक होते. स्कॉटिश प्रेसबेटेरियन विल्सन हायस्कूलमध्ये गेले असता, तिथे त्यांना क्रिकेटविषयी आवड निर्माण झाली. त्यानंतर त्या शाळेतील शिक्षकांनी त्यांचा खेळ पाहून त्यांना क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहित केले.
माधव आपटे हे जरी उजव्या हाताचे फलंदाज असले, तरीही १९४८ मध्ये एलफिन्स्टन महाविद्यालयात विद्यार्थी असताना विनू मंकड यांच्या प्रशिक्षणाखाली लेग स्पिन गोलंदाज म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९५१ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी मेरी विद्यापीठातर्फे दौर्यावर आलेल्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबविरूद्ध प्रथम श्रेणीतील पदार्पण केले.
वेस्ट इंडीज दौऱ्यात माधव आपटेंनी केला पहिला राष्ट्रीय विक्रम…
सन १९५२ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सौराष्ट्र क्रिकेट संघाविरुद्ध पहिला रणजी सामना खेळला. विजय मर्चंट जखमी झाल्यामुळे त्यांचा मुंबई संघात समावेश करण्यात आला होता. त्याच मोसमात त्यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध भारताच्या राष्ट्रीय संघाकडून पदार्पण केले. माधव आपटे यांनी बंगाल क्रिकेट संघाकडून देखील एक हंगाम खेळला होता.
‘विनू मंकड हे माधव आपटे यांच्या खेळाचे मोठे चाहते होते. त्यांनीच पुढे जाऊन आपटे यांना मुंबई क्रिकेट संघाचे कर्णधार पद मिळवून देण्यासाठी प्रयत्न देखील केले.’
१९५३ मध्ये आपटे यांची वेस्ट इंडीज दौर्यासाठी निवड झाली होती. तेथे पोर्ट ऑफ स्पेन येथे पॉली उम्रीगर यांच्यानंतर त्यांनी भारतासाठी दुसर्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्या दौऱ्यात वेस्ट इंडीजच्या भेदक गोलंदाजीचा सामना करत त्यांनी ४६० धावा जमवल्या होत्या. भारताकडून कोणत्याही सलामीवीराने ४०० हून अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ होती.
क्रिकेटचे कौशल्ये ठासून भरलेला हा खेळाडू मात्र अचानक संघाबाहेर फेकला गेला….
सन १९५४ मध्ये माधव आपटे हे भारताकडून फक्त एकच सामना खेळू शकले. त्यानंतर त्यांची पुन्हा राष्ट्रीय संघात निवड झाली नाही. तेव्हा त्यांना का वगळण्यात आले, हे अद्याप न सुटलेले कोडे आहे. त्यांनी ७ कसोटी सामने खेळत ४९.२७ च्या सरासरीने ५४२ धावा केल्या होत्या. तर, ६७ प्रथमश्रेणी सामन्यात त्यांच्या नावे साडेतीन हजारपेक्षा जास्त धावा जमा आहेत.
माधव आपटे यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, “वेस्ट इंडिज दौरा यशस्वी झाल्यानंतर, त्यावेळचे निवडसमितीचे लाला अमरनाथ यांनी नवी दिल्ली येथे माझ्या वडिलांना भेटायला बोलावले. लालाजींना आमच्या कौटुंबिक व्यवसाय असलेल्या कोहिनूर मिल्सची काही भागीदारी हवी होती. त्यांना वडिलांनी नम्रपणे नकार दिला होता. यानंतर माझी कधीही भारतीय संघात निवड झाली नाही.”
वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत अन् डीबी देवधर ते सचिन तेंडुलकर यांच्यासोबत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू…
राष्ट्रीय संघात निवड होत नसल्याचे पाहून त्यांनी, वयाच्या ३४ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले तरीही ते प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत राहिले. त्यांनी आपला शेवटचा प्रथमश्रेणी सामना १९६७-६८ साली रणजी ट्रॉफी अंतिम फेरीत खेळला होता.
आपटे हे वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत मुंबईतील प्रतिष्ठित कांगा लीगमध्ये खेळत. डीबी देवधर आणि सचिन तेंडुलकर यांच्यासोबत खेळलेले आपटे हे एकमेव क्रिकेटपटू आहेत. १९८९ मध्ये ते क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष झाले. आपटे उद्योग समूहाचे अध्यक्ष असलेल्या माधव आपटे यांनी मुंबई चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्षपद देखील भूषवले.
अखेरच्या क्षणापर्यंत क्रिकेटप्रती समर्पित राहिलेले माधव आपटे…
माधव आपटे हे त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत क्रिकेटप्रती अतिशय समर्पित होते. त्यांच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत ते अत्यंत तंदुरुस्त होते. ते त्यांचे मित्र आणि १५ वेळा बॅडमिंटनचे राष्ट्रीय विजेते राहिले नंदू नाटेकर यांच्यासमवेत दररोज बॅडमिंटन खेळत. दिनांक २३ सप्टेंबर २०१९ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले होते.
वाचा- एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवलेला विराटचा मित्र बिहारच्या राजकारणात ठरतोय ‘किंग’