आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. खेळाडूंना कायम राखण्याची प्रक्रिया झाल्यानंतर गुरुवारी (१८ फेब्रुवारी) रोजी चेन्नई येथील ग्रँड चोला या पंचतारांकित हॉटेलमध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडेल. या लिलावात सर्व संघ आपल्या ताफ्यात रिक्त असलेल्या जागा भरण्याचा प्रयत्न करतील. आयपीएलचा लिलाव २४ तासांवर आला असताना, त्याविषयी इत्थंभूत माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करूया.
मिनी लिलाव
चेन्नई येथे १८ फेब्रुवारी रोजी पार पडणारा लिलाव हा ‘मिनी लिलाव’ असेल. आयपीएलमध्ये प्रामुख्याने ‘मिनी लिलाव’ व ‘मेगा लिलाव’ या दोन प्रकारचे लिलाव होत असतात. आयपीएलचा अखेरचा मेगा लिलाव २०१८ मध्ये पार पडला होता. चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स संघ निलंबनानंतर परत आल्याने हा लिलाव झाला होता. दुसरीकडे, मिनी लिलावात सर्व फ्रेंचायजी आपल्या संघात रिक्त असलेल्या जागा भरण्याचा प्रयत्न करतात. गुरुवारी होणार्या लिलावात जास्तीत जास्त ६१ खेळाडूंवर बोली लावली जाऊ शकते. यासाठी, २९२ खेळाडूंची अंतिम यादी तयार केली गेली आहे.
खेळाडूंची आधारभूत किंमत
लिलावापूर्वी सर्व खेळाडूंची आधारभूत किंमत (बेस प्राईज) ठरविली जाते. विदेशी खेळाडूंना तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडूंना आपली आधारभूत किंमत ठरवण्याचा अधिकार असतो. ज्यामध्ये ते ५० लाख, ७५ लाख, १ कोटी, दीड कोटी व दोन कोटी यापैकी एका किमतीची निवड करू शकतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या क्रिकेटपटूंना या लिलावात आपली किंमत २०,३० व ४० लाख यापैकी ठरवण्याची मुभा असते.
एका संघात किती खेळाडू ?
सर्व फ्रेंचायजी त्यांच्या संघात जास्तीत जास्त २५ आणि कमीत कमी १८ खेळाडू सामील करून घेऊ शकतात. कोणत्याही संघात कमाल ८ विदेशी खेळाडू असू शकतात. सद्यपरिस्थितीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने १४ खेळाडू तर सनरायझर्स हैदराबादने सर्वाधिक २२ खेळाडू कायम राखले आहेत. याचा अर्थ आरसीबीला लिलावात कमीतकमी ४ खेळाडू खरेदी करावे लागतील. त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबाद केवळ ३ खेळाडू खरेदी करू शकतात.
किती संघांकडे किती रक्कम आहे शिल्लक
चौदाव्या हंगामाच्या लिलावापूर्वी किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडे सर्वाधिक ५३.२० कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यापाठोपाठ, राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे अनुक्रमे ३७.८५ व ३५.४० कोटी रुपये शिल्लक आहेत. दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्सकडे अनुक्रमे १३.४० व १९.९० कोटी रुपये शिल्लक आहेत. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनकडे १५.३५ कोटी तर कोलकत्ता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबादकडे सर्वात कमी प्रत्येकी १०.७५ कोटी रुपये खर्च करण्यासाठी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलाव : १४ व्या हंगामासाठी ‘या’ खेळाडूंना संघात सामील करु शकतो बेंगलोर संघ
‘या’ कारणामुळे जो रूटने मागितली मोईन अलीची माफी