आयसीसीने आज कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांची क्रमवारी घसरली आहे. विराटला इंग्लंड कर्णधार जो रूटने मागे टाकले आहे. त्यामुळे आता विराट दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आला आहे.
पुजाराचीही क्रमवारी २ स्थानांनी घसरली आहे. तो आता पाचव्या स्थानावर आला आहे. याबरोबरच या फलंदाजी क्रमवारीत शिखर धवनची ३ स्थानांनी , मुरली विजयची ५ स्थानांनी आणि रोहित शर्माचीही ३ स्थानांनी क्रमवारीतही घसरण झाली आहे. या क्रमवारीत सध्या शिखर ३३ व्या, विजय ३० व्या आणि रोहित ४४ व्या स्थानी आले आहेत.
कालच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला ७२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी अगदी सुमार झाली होती. गोलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी केली होती. या सामन्यातील कामगिरीचा आज जाहीर झालेल्या कसोटी क्रमवारीत फरक पडला आहे.
भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमारने या सामन्यात पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात २ बळी घेतले होते. यामुळे त्याने गोलंदाजी क्रमवारीत ८ स्थानांची सुधारणा करून २२ वे स्थान मिळवले आहे. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे.
तसेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा आणि ३ बळी घेणारा हार्दिक पंड्याने अष्टपैलू क्रमवारीत २४ स्थानांची प्रगती केली आहे. तो आज जाहीर झालेल्या क्रमवारीत ४९ व्या स्थानी आला आहे.
याबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने गोलंदाजी क्रमवारीत अव्व्ल स्थान मिळवले आहे. त्याने इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला मागे टाकले आहे.