पुणे। रविवारी(13 ऑक्टोबर) भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवरवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयात भारताचा कर्णधार विराट कोहलीने द्विशतक करत मोलाचा वाटा उचलला. त्याने पहिल्या डावात 336 चेंडूत नाबाद 254 धावांची खेळी केली होती.
विराटच्या या खेळीमुळे त्याने आयसीसी कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा 900 गुणांचा टप्पा पार केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विशाखापट्टणमला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराटचे गुण कमी झाले होते. तो 899 गुणांवर घसरला होता. पण त्याने पुण्यातील कसोटीत द्विशतक केले. त्यामुळे त्याचे आता 936 गुण झाले आहे.
तो सध्या क्रमवारीत 936 गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम असला तरी त्याच्यातील आणि अव्वल क्रमांकावर असणाऱ्या स्टिव्ह स्मिथमधील गुणांचे अंतर कमी झाले आहे. आता त्यांच्यात केवळ 1 गुणाचे अंतर आहे. स्मिथचे 937 गुण आहेत.
याबरोबरच या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पहिल्या 10 जणांमध्ये अजिंक्य रहाणे 9 व्या क्रमांकावर आला आहे. तर चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर कायम आहे. तसेच पुण्यातील कसोटीत शतकी खेळी करणारा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने 8 स्थानांची प्रगती करत 17 वे स्थान मिळवले आहे.
त्याचबरोबर अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने फलंदाजांच्या यादीत कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. तो आता 40 व्या क्रमांकावर आला आहे. मात्र सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची 17 व्या क्रमांकावरुन 22 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
तसेच गोलंदाजांच्या यादीत आर अश्विनने 3 स्थानांची प्रगती करत 7 वे स्थान मिळवले आहे. तर उमेश यादवनेही 6 स्थानांची झेप घेत 25 वा क्रमांक मिळवला आहे. या दोघांनीही पुणे कसोटीत प्रत्येकी 6 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच मोहम्मद शमी 16 व्या क्रमांकावर कायम आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे.
याबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डूप्लेसिस फलंदाजांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर आहे. तसेच पुणे कसोटीत तळातील फलंदाज वर्नोन फिलँडर आणि केशव महाराजने दाखवलेल्या फलंदाजीतील उत्तम कामगिरीमुळे त्यांना फलंदाजी क्रमवारीत बढती मिळाली आहे.
फिलँडर आता 92 व्या क्रमांकावरुन 82 व्या क्रमांकावर तर महाराज 130 व्या क्रमांकावरुन 115 व्या क्रमांकावर आला आहे. पण दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटॉन डीकॉकची मात्र 10 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
तसेच फलंदाजी क्रमवारीत बढती मिळाली असली तरी फिलँडरची गोलंदाजी क्रमवारीत 5 व्या स्थानावरुन 8 व्या स्थानी घसरण झाली आहे.
⬆️ Ashwin
⬇️ PhilanderAfter taking six wickets in India's win over South Africa in Pune, R Ashwin has continued his rise in the @MRFWorldwide ICC Test Rankings for bowlers. pic.twitter.com/1whGqEfnxk
— ICC (@ICC) October 14, 2019






