ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यादरम्यानच्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील ( बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ) पहिल्या सामन्याला गुरुवारपासून (१७ डिसेंबर) सुरुवात झाली. हा सामना ऍडलेड ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने संयमी अर्धशतक झळकावत भारताचा डाव सावरला. त्याने १८० चेंडूत ७४ धावा केल्या.
या खेळीदरम्यान विराटने एक विशेष कामगिरी आपल्या नावे केली. आपल्या कसोटी कारकिर्दीत विराटने इतर कोणत्याही मैदानापेक्षा ऍडलेडच्या मैदानावर सर्वाधिक धावा काढण्याची कामगिरी केली आहे.
भारताची निराशाजनक सुरुवात
ऍडलेड ओव्हलवरील या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉची शून्यावर दांडी गुल करत भारताला पहिला धक्का दिला. दुसरा सलामीवीर मयंक अगरवाल पॅट कमिन्सचा बळी ठरला. मयंक बाद झाला तेव्हा भारताची अवस्था १८ षटकात ३२-२ अशी झाली होती.
विराटने केली अर्धशतकी खेळी
सुरुवातीच्या धक्क्यानंतर सावरत अनुभवी चेतेश्वर पुजारा व कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या गड्यासाठी ६८ धावा जोडून भारताची धावसंख्या १०० पर्यंत पोहोचवली. पुजाराच्या रूपाने भारताने तिसरा गडी गमावल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे व कर्णधार विराटने ८८ धावांची भागीदारी करत भारताचा डाव २०० धावांकडे नेण्यास सुरुवात केली. मात्र, विराटला दुर्दैवीरित्या धावबाद व्हावे लागले. त्याने ७४ धावा केल्या.
एकाच मैदानावर विराटच्या सर्वाधिक धावा
विराटने आपल्या ७४ धावांच्या खेळीदरम्यान एक विशेष कामगिरी आपल्या नावे केली. २०११ पासून कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या विराटने कोणत्याही एकाच मैदानावर ५०० धावा करण्याची कामगिरी पहिल्यांदाच केली आहे. विराटने ऍडलेडच्या ऍडलेड ओव्हल मैदानावर चार कसोटी सामन्यांच्या सात डावात ५०५ धावा काढण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये तीन शतक व एका अर्धशतकाचा समावेश आहे.
या मैदानांवरही केली आहे दमदार कामगिरी
विराटने ऍडलेड व्यतिरिक्त दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर ४६७ कसोटी धावा काढल्या आहेत. त्यापाठोपाठ, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याच्या नावे ४३३ धावा जमा आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर आणि नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर विराटने अनुक्रमे ३७९ व ३५४ धावा फटकावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘रनमशीन’ कोहली बनला नंबर-१ कर्णधार; केली ‘ही’ विशेष कामगिरी
IND vs AUS : ऑस्ट्रेलियन दिग्गजाची चेतेश्वर पुजाराविषयी वादग्रस्त कमेंट, चाहत्यांनी केले ट्रोल
कभी कभी लगता है की अपुनही आफ्रिदी है! ‘पृथ्वी शॉ’ शून्यावर बाद झाल्यामुळे माध्यमांवर मीम्सचा पाऊस






