–पराग पुजारी
आजच्या १४ मार्च या तारखेने भारतीय कसोटी क्रिकेट बऱ्याच अंशी बदलले असे कुणी म्हणत असेल तर त्यावर विश्वास ठेवा. कारण हे खरं आहे. सतरा वर्षं होऊन गेली त्या दिवसाला, त्या टेस्टला, त्या खेळीला, त्या कायच्या काय भागीदारीला.. पण अजूनही ती टेस्ट कायम स्मरणात आहे, कारण अशी टेस्ट त्यापूर्वी झालीच नव्हती. ती खेळी, भागीदारी अजून आठवते कारण शतकातील सर्वोत्तम खेळी आणि भागीदारी असा खुद्द विस्डेननेच तिला मान दिलाय आणि विस्डेनला क्रिकेटमधलं चांगलं कळतं यावर तरी किमान दुमत असण्याचं कारण नाही.
सलग सोळा टेस्ट्स जिंकून स्टीव्ह वॉ भारताला भारतात हरवून आता फायनल फ्रंटियर पूर्ण करण्याचे मनसुबे घेऊन आला होता. पहिली मुंबई टेस्ट त्याने सहज जिंकलीही आणि सहज म्हणजे किती सहज तर तीन दिवसात आणि दहा विकेट्सनी. सामनावीर गिलख्रिस्टने ११२ मध्ये १२२ ठोकल्या होत्या. दुसरी कोलकाता टेस्ट सुरु होताना दडपण अर्थात आपल्यावर होते. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने बॅटिंग घेतली आणि मुंबईत खेळलेले श्रीनाथ, आगरकर हे बदलून आपण यावेळी प्रसाद, झहीर घेतले होते आणि विश्वास ठेवा पण वेंकटपथी राजू नावाचा एक मनुष्यही टीममध्ये घेतला होता. पण तरीही मुंबई टेस्ट जिंकतानाचीच इनिंग जणू पुढे सुरु ठेवत हेडन – स्लेटर यांनी शतकी सलामी दिली. हेडनचं शतक हुकलं तरी नंतर स्टीव्हने शतक मारलंच आणि कांगारूंचा स्कोर झाला ४४५. खरं तर हा आकडा सहज ६०० च्या पार गेला असता, पण या इनिंगमध्ये सात विकेट्स घेणाऱ्या हरभजनने भारताकडून पहिली टेस्ट हॅट्ट्रिक नोंदवत पॉन्टिंग, गिलख्रिस्ट, वॉर्न यांना सलग बाद केलं आणि ऑसीजची मधली फळी कोलमडली. पण अर्थात नंतर २६९/८ वरून त्यांना ४४५ पर्यंत पोचवण्याचं क्रेडिटही आपल्या बॉलर्सना मिळालंच पाहिजे.
शिवसुंदर दास आणि सदागोपन रमेश.. खरं तर शास्त्रीय संगीताच्या मैफली असतात त्यात ही नावं सरोदवादक, संतूरवादक म्हणून सहज खपून जावीत अशी, पण इथे मात्र हातात बॅट नावाचं वाद्य घेऊन हे दोघे महानुभाव आपली इनिंग सुरु करायला आले. रमेशला गिलेस्पीने वाद्य वाजवायला देणं सोडाच, पण साधं ट्यूनिंग करायलाही वेळ न देता शून्यावर बाद केलं. नंतरही आपले बॅट्समन येत राहिले, जात राहिले. एकटा लक्ष्मण टिच्चून उभा राहिला, पण त्याच्या झुंजार ५९ ही भारताला १७१ पर्यंतच नेऊ शकल्या.
तब्बल २७४ चं लीड मिळाल्यावर स्टीव्ह वॉने अगदी खुशीत फॉलोऑन दिला आणि ऑसी बॉलर्सही डावाने टेस्ट जिंकण्याच्या इराद्याने ‘चला पुन्हा लगेच दहा विकेट्स घेऊन टाकू’ म्हणत मैदानात आले. पण त्यांचे वांधे तिथूनच सुरु झाले जेव्हा रमेशची पहिली विकेट मिळायलाच त्यांना १७ ओव्हर्स टाकाव्या लागल्या. आता तिसऱ्या नंबरवर नेहमीचा राहुल द्रविड येईल असं समालोचकांसह सर्वाना वाटलं, पण गांगुलीने इथे एक जुगार खेळला आणि पॅव्हेलियनमधून लक्ष्मण बाहेर आला, नेहमीच्या मनगटी शैलीदारपणे खेळू लागला पण दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने विकेट्स पडू लागल्या. दास गिलेस्पीला शरण गेल्यावर सचिन आला आणि पहिल्या इनिंगप्रमाणेच आत्ताही फक्त १० वर बाद झाला. मग गांगुली – लक्ष्मण यांनी एकमेकांचे रनिंग बिटवीन द विकेट सांभाळत नेटाने शतकी भागी रचली आणि भारताला जरा सुस्थितीत आणले. गांगुली ४८ वर गेला आणि मग एकदाचा सहाव्या नंबरवर द्रविड आला. लक्ष्मण आणि द्रविड यांचे क्रमांक स्वॅप करण्याचा गांगुलीचा जुगार लक्ष्मणने तरी आत्तापर्यंत सार्थ ठरवला होता, आता पाळी होती द्रविडची. उरलेला वेळ खेळून काढत तिसरा दिवस संपला तेव्हा लक्ष्मण १०९* आणि द्रविड ७* असे दोघे नाबाद राहिले. भारत २५४/४. पण ऑसी लीड पाहिल्यास एका अर्थी हा स्कोर म्हणजे मायनस वीस वर चार विकेट्स.
आणि मग उजाडला दिवस – १४ मार्च २००१. (हे वाक्य एम एस धोनी सिनेमातल्या ‘फिर आता है युवराज सिंग’ या संवादाच्या शैलीत वाचावे). लक्ष्मण – द्रविडनंतर मोंगिया आणि बॉलर्स असे आपले शेपूट होते. या १४ मार्च रोजी मॅग्रा, गिलेस्पी, कस्प्रोविझ, वॉर्न पळत राहिले, बॉलिंग टाकत राहिले, फिल्डर्स दमत राहिले. अम्पायर्सना हात आडव्या रेषेत फिरवण्याचा दिवसभर भरपूर व्यायाम मिळाला, पण त्यांचा एक हात काही वर जाईना. मग स्कोरबोर्डवरील विकेटस कॉलममधला आकडा काही वाढेना तेव्हा स्टीव्हने एकेक करत सगळ्यांना तू ये, तू ये करत बॉलिंग द्यायला सुरुवात केली. म्हणजे असं बघा, टीममध्ये मॅग्रा, गिलेस्पी, वॉर्न असतानाही मार्क वॉ, पॉन्टिंग आणि चक्क हेडन, लँगर, स्लेटर या पाचजणांना मिळून ३९ ओव्हर्स टाकाव्या लागल्या. इतकं झालं तरी काय होतं?
तर जे काही झालं होतं ते बॅटिंगमध्ये झालं होतं. चौथा दिवस संपला होता आणि भारताचा स्कोर होता ५८९/४. लक्ष्मण २७५* आणि द्रविड १५५*. अरेच्चा हेच दोघे तर तिसरा दिवस संपतानाही खेळत होते की, म्हणजे दोघांनीच अख्खा दिवस, तीन सेशन्स, नव्वद ओव्हर्स, नऊ बॉलर्स कोलकात्याच्या त्या मार्चच्या रणरणत्या उन्हात खेळून काढले? आपली टीम मुंबई टेस्ट तीन दिवसात फडशा पाडत जिंकणारी नक्की तीच ऑस्ट्रेलियन टीमच आहे ना, कालही हेच दोघे नाबाद होते आणि आजही तेच, इनिंगही तीच सुरु आहे, चौदा तारीख उगवलीच नाहीये की काय, असे अनेक प्रश्न स्टीव्ह वॉला त्या दिवशी संध्याकाळी पॅव्हेलियनकडे परतताना पडले असतील. आणि ही अद्भुत जादू करणारे दोन जादूगार होते वांगीपुरप्पू वेंकटा साई लक्ष्मण आणि राहुल शरद द्रविड. दोघांनी दिवस फक्त खेळूनच काढला नाही तर दिवसात उत्तम सरासरीने तब्बल ३३५ धावा फटकावल्या. समोर मॅग्रा- वॉर्न असताना त्या एका दिवसात लक्ष्मणने १६६ तर द्रविडने १४८ केले. (हीच ती वेळ, हाच तो क्षण – घाला तोंडात बोटे) ड्राइव्हज, कट्स, पूल, फ्लिक अशी सगळीच नितांतसुंदर मेजवानी दोघांनी आपल्या बॅटमधून सर्व्ह केली आणि ऑसी बॉलर्सचे आकडे वाट्टेल तसे वाढवून ठेवले, अर्थात शेवटचा कॉलम वगळता. गांगुलीचा तो एक जुगार आता अचानक मास्टरस्ट्रोक ठरला होता.
पाचव्या दिवशी सुरुवातीलाच लक्ष्मण २८१ वर बाद झाल्याने जोडी फुटली. तब्बल ३७६ ची भागीदारी जी आधी मॅच सेव्हिंग वाटत होती आणि आता कदाचित मॅच विनिंग ठरू पाहत होती. द्रविडला ३०० ची भागीदारी नवीन नव्हती, त्याने आधीही वनडेत गांगुली आणि सचिनसोबत एकेक तीनशेची भागीदारी केली होती. आता टेस्टमध्येही झाली, त्याला तो छंदच होता, त्यानंतरही त्याने कसोटीत ३००, ४०० च्या भागीदाऱ्या रचल्या. काही वेळाने द्रविड १८० वर बाद झाल्यावर गांगुलीने इनिंग डिक्लेअर करण्यापूर्वी शेवटी झहीर आणि हरभजनने पटापट दाही दिशांना बॅट फिरवून घेतली. स्कोर चक्क ६५७/७ असताना आपली इनिंग डिक्लेअर झाली.
३८४ चे अशक्यप्राय टार्गेट घेऊन हेडन – लँगर खेळायला आले. त्यांनी सुरुवात झकास केली आणि आपल्याला अर्ली विकेट्स दिल्या नाहीत. स्कोर ७४ असताना लँगर गेला आणि पुढे चहापानालाही स्कोर १६१/३ पाहून टेस्ट ड्रॉ होणार हे नक्की वाटू लागले. पाचव्या दिवसाचा शेवटचा सेशन – भारताला हव्यात सात विकेट्स आणि भक्कम ऑसी बॅटिंग पाहता हे शक्य वाटत नव्हते. हेडन- स्टीव्ह निवांत खेळत टेस्ट इमानदारीत ड्रॉकडे घेऊन जात हरभजनने अचानक स्टीव्ह आणि पॉन्टिंग दोघांना एकाच ओव्हरमध्ये टाटा केले. इथून जी ऑसी पडझड झाली ती अद्भुत होती. बॅटिंगमध्ये फेल गेलेला सचिन बॉलिंगमध्ये गांगुलीने कदाचित ट्रम्प कार्ड म्हणून राखून ठेवला असावा, कारण पुढच्याच ओव्हरला सचिनने गिलख्रिस्टला बाद केले, आणि त्याच स्पेलमध्ये हेडन आणि वॉर्नलाही तसेच एलबीडब्ल्यू केले. १६६/३ वरून १७४/८. शेवटच्या दोन विकेट्स हरभजनने घेत २१२ वर ऑस्ट्रेलियाला संपवले. आणि भारताला पहिल्या इनिंगमध्ये १७१ मध्ये गुंडाळणारे कांगारू १७१ धावानीच हरले हा योगायोग. पुढची चेन्नई टेस्ट जिंकून भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खिशात घातली.
एक भागीदारी मॅचच नव्हे तर सीरिज कशी पालटू शकते याचे २००१ कोलकाता टेस्ट म्हणजे उत्तम उदाहरण. फॉलोऑनच्या किंबहुना मॅच नि पर्यायाने सिरीज गमावण्याच्या प्रेशरखाली असताना अशी भागीदारी करणे प्रचंड कठीण होते, आणि अशा कठीण सिच्युएशन्समधून टीमला बाहेर काढणे हेच बीसीसीआयने द्रविड, लक्ष्मण यांना दिलेल्या जॉब प्रोफाइलमध्ये किंवा अग्रीमेंटमध्ये लिहिले असावे असे त्यांच्या अनेक टेस्ट इनिंग्ज पाहून वाटते. आम्ही एकेक ओव्हरचा विचार करत खेळत गेलो असं द्रविडने त्या भागीदारीबद्दल बोलताना एकदा सांगितलं होतं. हरभजनच्या सामन्यात तेरा विकेट्स, द्रविडच्या १८० याहीपेक्षा ही टेस्ट अर्थातच कायम ओळखली जाते ती लक्ष्मणच्या अफलातून २८१ साठी. हा भारताकडूनही तेव्हाचा हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर ठरला होता. फॉलोऑन देऊनही हरण्याची अपमानास्पद नामुष्की ऑस्ट्रेलियाला सहन करावी लागली. स्टीव्हला तर नक्कीच १४ मार्च तारीख आवडत नसणार, बरोबर चार वर्षांपूर्वीही १४ मार्चलाच त्याने विंडीजविरुद्ध किंग्स्टनमध्ये खेळताना ब्रायन लारा असाच नाबाद ७ वरून नाबाद २१२ वर पोचताना पाहिला होता, तेव्हाही असेच स्टीव्हचे पहिल्या डावातले शतक झाकोळले गेले होते, आणि तेव्हाही हा ऑसी कॅप्टन टेस्ट हरला होता.
ही कोलकाता टेस्ट खास का आहे? त्या एका इनिंगमधून लक्ष्मणचा व्ही व्ही एस ते व्हेरी व्हेरी स्पेशल प्रवास पहा, हरभजनच्या उड्या पहा, द्रविड-लक्ष्मणचा शतके झाल्यावरचा आनंद आणि दिवसभर किल्ला लढवून परततानाचे थकल्या चेहऱ्यावरचे समाधान पहा, त्या तीन विकेट्स घेतल्यावरचा सचिनच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा, आपल्या घरच्या मैदानावर गांगुलीचा वेळोवेळी दिसणारा आवेश पहा, टोनी ग्रेगची कॉमेंटरी ऐका. ती टेस्ट म्हणजे एक कम्प्लिट पॅकेज आहे हे निश्चित पटेल.
ही टेस्ट तेव्हा टीव्हीवर लाइव्ह पाहणाऱ्यांपैकी मी एक नाही, त्यामुळे ज्यांनी ती तशी पाहिली त्यांचा हेवा नक्कीच वाटतो. पण तरीही थँक्स द्रविड आणि लक्ष्मण.. तुम्ही आमच्या लॅपटॉपमध्ये एक इनिंग कायमची सेव्ह करून ठेवायला दिलीत.