टी२० विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारतीय संघाने दमदार प्रदर्शन केले होते. मात्र, भारतीय संघाचे सुपर १२ फेरीत अतिशय सुमार दर्जाचे प्रदर्शन राहिले आहे. यामुळे भारतीय संघावर चाहत्यांसोबत क्रिकेट आजी-माजी खेळाडूंनी देखील ताशेरे ओढले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर तर भारतीय संघाला अधिकच टीकेचा सामना करावा लागला. मात्र, भारतीय खेळाडूंच्या समर्थनार्थ भारताचे माजी सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत मैदानात उतरले आहेत.
बायो-बबलचा थकवा खेळाडूंच्या मनावर परिणाम करतो, असे श्रीकांत यांचे मत आहे. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला त्यांनी विशेष सल्ला दिला. भारताच्या वेळापत्रकावर चर्चा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
श्रीकांत यांनी ट्वीट केले असून त्यांनी म्हटले, ‘मी खेळाडूंना पूर्ण पाठिंबा देतो, मानसिक थकवा ही खरी गोष्ट आहे आणि बीसीसीआयने त्यांच्या वेळापत्रकावर लक्ष केंद्रित करण्याची आणि सर्व खेळाडूंची काळजी घेण्याची वेळ आली आहे. मी भारतीय खेळाडूंना पाठिंबा देतो आणि आता आपल्यावर भारतीय खेळाडूंची काळजी घेण्याची वेळ आली आहे.’
I totally back the players, mental fatigue is a real thing and it's high time @BCCI looks into their scheduling and make sure they take care of all the players, I back the Indian players and itd high time we take care of them!
— Kris Srikkanth (@KrisSrikkanth) November 1, 2021
भारतीय संघाने सतत क्रिकेट खेळत टी२० विश्वचषकात प्रवेश केला होता. टी२० विश्वचषक संपल्यानंतरही, भारत तीन टी२० आणि दोन कसोटी सामन्यांसाठी न्यूझीलंडचे यजमानपद भुषवणार आहे. त्यानंतर डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा सर्व एकदिवसीय, टी२० आणि कसोटी मालिका असा एक मोठा दौरा होईल.
सध्या टी-२० विश्वचषकात दोन पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाला आता उपांत्य फेरी गाठणे कठीण झाले आहे. भारताच्या खराब कामगिरीमागे खेळाडूंचे सतत क्रिकेटमध्ये सक्रिय राहणे हेही याचे कारण असल्याचे मानले जात आहे. विशेषत: विराट कोहली, ज्याने सतत क्रिकेट खेळताना तिन्ही प्रकारामध्ये कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह म्हणाला होता की, थकव्याचा मनावर परिणाम होतो. बुमराह म्हणाला, ‘कधीकधी तुम्हाला विश्रांतीची गरज असते. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आठवण येते. आम्ही सहा महिने सतत खेळत आहोत. साहजिकच बायो-बबलमध्ये राहणे आणि इतके दिवस आपल्या कुटुंबापासून दूर राहणे, या गोष्टी थकवा आणण्यात भूमिका बजावतात. बीसीसीआयनेही आम्हांला सोयीचे वाटावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, पण ही वेळ कठीण आहे. एक जागतिक महामारी सुरू आहे, म्हणून आम्ही गोष्टी योग्य करण्याचा प्रयत्न करतो परंतु कधीकधी बायो-बबल थकवा आणतो. मानसिक थकवा देखील आणतो.’
महत्त्वाच्या बातम्या –
‘कसे नाही का पराभूत झाला?’; दिग्गज काँग्रेस नेत्याचा विराटला थेट सवाल
‘प्रिय विराट, हे लोक द्वेषाने भरलेले आहेत, त्यांना…’, राहुल गांधींकडून कोहलीला समर्थन
टी२० विश्वचषकादरम्यान दिग्गज पंचांनी बायोबबलचे केले उल्लंघन, आयसीसीने केली ‘मोठी’ कारवाई