इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत अनेक असे विस्फोटक फलंदाज होऊन गेले आणि आहेत, ज्यांनी आपल्या फलंदाजीने मोठमोठ्या गोलंदाजांना थकवून सोडले. याच विस्फोटक फलंदाजांच्या यादीत विराट कोहली, ख्रिस गेल आणि एमएस धोनी यांसारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. अशातच कोलकाता नाईट रायडर्स संघाचा गोलंदाज कुलदीप यादव याने आयपीएल स्पर्धेतील असे दोन फलंदाज निवडले आहेत, ज्यांच्यासमोर गोलंदाजी करणे खूप अवघड आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धेत कुलदीप यादव कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “माझ्या मते रोहित शर्मा आणि एबी डिविलियर्स हे आयपीएलमधील सर्वात विस्फोटक फलंदाज आहेत, ज्यांच्यासामोर गोलंदाजी करणे खूप कठीण आहे. एबी डिविलियर्स मैदानातील कुठल्याही कानाकोपऱ्यात शॉट खेळण्यात सक्षम आहे. तर दुसरीकडे रोहित शर्माकडे देखील कुठलाही चेंडू खेळण्यासाठी अतिरिक्त वेळ असतो.”
धोनी आणि गेलचे केले कौतुक
एमएस धोनी आणि ख्रिस गेलचे कौतुक करताना कुलदीप यादव म्हणाला, ” जर तुम्ही आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून ते आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहाल तर तुम्हाला जाणवेल की, धोनी आणि गेल हे दिग्गज खेळाडू आहेत. ते आताही चांगलेच प्रदर्शन करत आहेत.”
हरभजन सिंगचे ही केले कौतुक
कोलकाता नाईट रायडर्स संघाने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. परंतु कुलदीप यादवला खेळण्याची संधी मिळाली नाही. या तीनही सामन्यात हरभजन सिंगला संधी देण्यात आली आहे.
हरभजन सिंगचे कौतुक करताना कुलदीप यादव म्हणाला, “आतापर्यंत फक्त ३ सामने खेळले गेले आहेत. मला विश्वास आहे की येणाऱ्या सामन्यांमध्ये मला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळेल. संघात भज्जू (हरभजन सिंग) पा आल्यामुळे मला खूप काही शिकायला मिळाले आहे. तुमच्यासोबत जेव्हा अनुभवी खेळाडू असतो तेव्हा तुम्हाला मदत होते. मी त्यांच्यासोबत बोलून माझ्या गोलंदाजीमध्ये सुधारणा करत आहे. ते मला तांत्रिकदृष्ट्या मदत करतच आहेत पण मानसिक दृष्टया ही मदत करत आहेत. ”
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई टू मुंबई, आरसीबीचा कर्णधार कोहली पत्नी अन् लेकीसह मुंबईत दाखल; विमानतळावरील Video व्हायरल
एका विभागातही स्वत:ला सिद्ध करू शकला नाही, मग तो अष्टपैलू कसा? दिग्गजाची ‘या’ भारतीय खेळाडूला फटकार