भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारपासून (१७ नोव्हेंबर) ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वीच न्यूझीलंड संघाला दुहेरी झटके बसले आहेत. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सनने भारताविरुद्ध २५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी टी२० मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याच्या पाठोपाठ न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनने देखील टी२० मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
जेमिसनने देखील विलियम्सनप्रमाणेच कसोटी मालिकेला महत्त्व देत टी२० मालिकेतून बाहेर होण्याचा निर्णय घेतला. याबद्दल न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की ‘आम्ही केन आणि काईल यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना टी२० मालिकेत न खेळवण्याचा निर्णय घेतला.’
त्यांनी पुढे म्हटले की ‘ते दोघे आता कसोटी सामन्यांसाठी तयारी करतील. तुम्हाला दिसेल की असे अनेक खेळाडू आहे, जे कसोटी सामने खेळणारे खेळाडूही पूर्ण मालिकेत खेळणार नाहीयेत. तीन टी२० सामन्यांसाठी ५ दिवसात तीन वेगवेगळ्या शहरात प्रवास करायचा असल्याने संतुलन राखण्याचा सध्या प्रयत्न आहे. हा खूप व्यस्त वेळ आहे.’
तरी, न्यूझीलंडसाठी जमेची बाजू अशी की टी२० विश्वचषकादरम्यान दुखापतग्रस्त झालेला लॉकी फर्ग्युसन बऱ्यापैकी तंदुरुस्त झाला असून तो भारताविरुद्धची टी२० मालिका खेळणार असल्याची दाट शक्यता आहे. न्यूझीलंड २०२१ टी२० विश्वचषकात उपविजेते ठरले आहेत.
असा आहे न्यूझीलंडचा भारत दौरा
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा रविवारी (१४ नोव्हेंबर) संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील टी२० मालिकेतील पहिला सामना १७ नोव्हेंबर रोजी जयपूर येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर १९ आणि २१ नोव्हेंबर रोजी अनुक्रमे रांची आणि कोलकाता येथे दुसरा आणि तिसरा टी२० सामना होणार आहे.
यानंतर २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान कानपूरला पहिला कसोटी सामना होईल. ३ ते ७ डिसेंबरदरम्यान मुंबईत दुसरा कसोटी सामना होणार आहे. कसोटी मालिका आयसीसी कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेचा भाग असेल.
असे आहेत न्यूझीलंड संघ
टी२० मालिका – टॉड ऍस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, ऍडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), ईश सोधी, टिम साऊथी.
कसोटी मालिका – केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), काईल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, विल सोमरविल, टिम साऊथी, रॉस टेलर, नील वॅगनर, विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी२० सामन्यासाठी ‘महा ड्रीम ११’; हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!
‘आता सध्या जिंकायचंय आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करायचंय’, मुख्य प्रशिक्षक द्रविड झाला व्यक्त
चला हसू! शॉट खेळण्यासाठी फलंदाज पोहोचला पॉईंटच्या फिल्डरजवळ, त्यानंतर जे झाले ते पाहून व्हाल लोटपोट