अवघ्या काही दिवसातच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान साउथम्पटन येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड या दोन्हीही संघांना विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. या सामन्यापूर्वी अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपली मत मांडले आहेत. तसेच हा सामना कोण जिंकेल याबाबतही भाष्य केले आले. आता माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या मोठ्या सामन्यासाठी भारतीय संघ गुरुवारी (३ जून) इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. तसेच ३ दिवासांचा विलागिकरण कालावधी पूर्ण करुन भारतीय संघाने सरावाला देखील सुरुवात केली आहे. एकीकडे न्यूझीलंड संघाला इंग्लंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायला मिळत आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाला सराव सामनासुद्धा खेळायला मिळणार नाही. यामुळे कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मासह भारतीय फलंदाजांच्या कामगिरीत फरक जाणवू शकत असल्याचे वेंगसरकर यांनी म्हटले आहे.
याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू वेंगसरकर म्हणाले की, “कोहली आणि रोहित हे चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. परंतु कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापुर्वी त्यांना सराव सामना खेळायला मिळणार नाही. त्यामुळे यांच्या फलंदाजीमध्ये थोडा फरक जाणवू शकतो.”
पुढे ते म्हणाले की, “तसं तर कोहली गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. रोहित आणि विराटसारखे खेळाडू विश्वस्तरीय फलंदाज आहेत. त्यांना त्यांच्या प्रदर्शनावर अभिमान आहे. याबरोबरच त्यांच्या योगदानामुळे भारतीय संघाला विजय मिळाल्यासही त्यांना गर्व वाटतो.”
“ही खूप चांगली गोष्ट आहे की, दोघेही दमदार फॉर्ममध्ये आहेत. परंतु मला असे वाटते की, त्यांना पहिल्या कसोटी सामन्यात सराव सामन्याची कमतरता जाणवू शकते. फलंदाजांसोबतच गोलंदाजांनाही मैदानावर वेळ घालवण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही जरी नेट्समध्ये सराव करत असाल, सामन्याची परिस्थिती जाणून घेत असाल. तरीही मैदानात येऊन सामना खेळल्याने नेहमीच फायदा होत असतो. मग तो सराव सामना असला तरीही,” असे त्यांनी शेवटी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘WTC फायनलमध्ये अश्विन-जडेजाला एकत्र खेळवा,’ ३५ कसोटीत ८८ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचे मत
कसोटी चॅम्पियनशीप फायनलसाठी विस्डेनने निवडली भारताची प्लेइंग XI, अनुभवी गोलंदाज बाहेर
ब्रॉडने षटकार मारत दाखवला धाक, दुसऱ्याच चेंडूवर बोल्ड करत गोलंदाजाने दिले चोख प्रत्युत्तर






