भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत झाला आहे. त्याला डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेननं सरळ सेटमध्ये पराभूत केलं. व्हिक्टरनं लक्ष्य सेनवर 22-20, 21-14 असा विजय मिळवला. आता लक्ष्य कांस्यपदकासाठी लढत देणार आहे. हा सामना उद्या (5 ऑगस्ट) सायंकाळी 6 वाजता होणार आहे.
लक्ष्य सेननं उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चाऊ टिन चेनचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. यासह तो ऑलिम्पिक सेमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे. कांस्यपदकासाठी लक्ष्य सेनचा सामना मलेशियाच्या ली जी जियाशी होणार आहे.
पहिल्या गेममध्ये सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर लक्ष्य सेननं शानदार पुनरागमन केलं. त्यानं स्कोर 5-5 असा बरोबरीत आणला. लक्ष्य इथेच थांबला नाही आणि काही वेळातच त्यानं 7-6 अशी आघाडी घेतली. मात्र, व्हिक्टरनं अल्पावधीतच 7-7 अशी बरोबरी साधली. दोन्ही खेळाडू एकमेकांवर मात करत होते. काही वेळातच 9-9 अशी बरोबरी झाली.
यानंतर स्कोअर 15-10 असा झाला. दरम्यान, लक्ष्यनं चांगला खेळ करत आघाडी घेतली. मात्र व्हिक्टर एक्सलसेननं शानदार पुनरागमन केलं आणि स्कोअर 19-17 असा केला. शेवटच्या क्षणांत व्हिक्टर आणि लक्ष्य यांच्यात निकराची लढत झाली आणि पहिल्या सेटमध्ये स्कोअर 20-20 पर्यंत पोहोचला. मात्र, शेवटी व्हिक्टरनं पहिला गेम 22-20 असा जिंकला.
लक्ष्य सेननं दुसऱ्या गेममध्येही दमदार सुरुवात केली. त्यानं 8-3 अशी आघाडी घेतली. मात्र यानंतर लक्ष्यनं काही चुका केल्या, ज्यामुळे व्हिक्टरला पुनरागमनाची संधी मिळाली. ब्रेकपर्यंत लक्ष्य सेन 11-10 ने आघाडीवर होता. ब्रेकनंतर व्हिक्टरनं पुनरागमन करत स्कोर 11-11 आणला. व्हिक्टर इथेच थांबला नाही आणि आपली आघाडी वाढवत राहिला. त्यानं लक्ष्यला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही आणि दुसरा गेम 21-14 असा जिंकला. यासह व्हिक्टरनं फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.
हेही वाचा –
रेड कार्ड, मैदानावर 10 खेळाडू; तरीही हार मानली नाही! ‘ग्रेट वॉल’ श्रीजेशचा पेनॉल्टी शूटआऊटमध्ये पराक्रम
इतिहास घडला! भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये एंट्री, पेनल्टी शूटआऊटमध्ये मिळवला शानदार विजय
महिला प्रीमियर लीगमध्ये होणार सीएसकेची एंट्री? लवकरच घेतला जाईल मोठा निर्णय