जगातील सर्वात मोठा फिनिशर कोण? असे विचारले की सर्वप्रथम धोनीचे नाव घेतले जाते. पण, २३ डिसेंबर २००४ रोजी जेव्हा धोनी खेळण्यासाठी आला त्याच्या, दोन महिन्यांपूर्वी असाच एक खेळाडू द. आफ्रीकेसाठी आपला अखेरचा सामना खेळला होता. ज्याने क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये ‘फिनिशर’ व अष्टपैलू या शब्दांची परिभाषा बदलून ठेवली होती. तो खेळाडू म्हणजे द. आफ्रिकेचा लान्स क्लुसनर. आज झुलू नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या धाकड अष्टपैलू खेळाडूचा ५१वा वाढदिवस.
झुलू भाषा बोलणाऱ्या आफ्रिकेतील नाताळ प्रांतातून येणारा लान्स आपल्या वेगवान गोलंदाजी व तुफानी फटकेबाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट वर्तुळात चांगलाच गाजला. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटने वेगवान गोलंदाजी, आक्रमक फलंदाजी व चपळ क्षेत्ररक्षण हे गुण फक्त भारताचे दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्यात पाहिले होते. नाताळमध्ये, क्लुसनरवर सर्वप्रथम माल्कम मार्शल यांची नजर पडली होती. मार्शल यांनी क्लुसनरला गोलंदाजी व फलंदाजीविषयी मार्गदर्शन केले आणि १९९३ मध्ये नाताळच्या वरिष्ठ संघात संधी दिली.
१९९६ मध्ये कोलकाता येथे झालेल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीचे कौशल्य दाखविले. त्या सामन्यात भारतीय फलंदाजी उद्ध्वस्त करत त्याने ६४ धावा देऊन ८ बळी मिळवले. गोलंदाजीत यशस्वी ठरल्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना त्याने मोहम्मद अजहरुद्दिनच्या एकाच षटकात पाच चौकार मारत आपल्या फलंदाजीची जादू दाखवून दिली. खरतर, जेव्हा या मालिकेसाठी क्लुसनरची निवड करण्यात आली, तेव्हा त्याला फक्त गोलंदाज म्हणून संघात स्थान आले होते. पदार्पणानंतर काही दिवसांनंतर त्याने कसोटी सामन्यात केप टाउन येथे भारताविरुद्धच्या १०० चेंडूंत १०२ धावा फटकावून आपण काय करू शकतो हे जगाला दाखवून दिले.
लान्स क्लुसनर याने कसोटी क्रिकेटमध्ये भरीव कामगिरी केली असली तरी त्याला आजही क्रिकेटजगत वनडे स्पेशालिस्ट म्हणून ओळखते. १७१ वनडे सामने खेळताना ४१.१० च्या सरासरीने ३,५७६ धावा काढताना त्याचा स्ट्राईक रेट ८९.९१ इतका अविश्वसनीय होता. यासोबत त्याने, १९२ बळी देखील घेतले होते. सहाव्या सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन फटकेबाजी करत तसेच अखेरच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या त्याच्या शैलीमुळे फिनिशर म्हणून ओळखला जाऊ लागला.
१९९९ चा क्रिकेट विश्वचषक क्लुजनरने अक्षरशः गाजवला होता. त्याची बेसबॉल शैलीची बॅकलिफ्ट आणि तुफान फटकेबाजीसाठी ही स्पर्धा ओळखली जाते. त्याने संपूर्ण स्पर्धेत १७ बळी व २५० धावा काढल्या होत्या. क्लुजनरचा योगदानामुळेच दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत स्थान मिळवू शकले होते. उपांत्य फेरीतील ‘तो’ ऐतिहासिक पराजय आजही त्याच्या कारकिर्दीतील सर्वात भळभळती जखम आहे. क्लुसनरने चार सामनावीर पुरस्कारांसोबत, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला होता. २००० मध्ये त्याला विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर म्हणूनही निवडले गेले.
क्लुसनरचा फॉर्म वेस्ट इंडिज (२००१-०१) आणि ऑस्ट्रेलिया (२००१-०२) दौर्यांवर ढासळला. त्याच्या खराब फॉर्ममुळे काही काळ त्याला संघातील जागेची किंमत मोजावी लागली. परंतु, २००३ विश्वचषकाद्वारे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. विश्वचषक सुद्धा चांगला न गेल्याने त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी संघातून वगळण्यात आले.
कसोटी संघातून वगळल्यानंतरही क्लुसनर एकदिवसीय संघात कायम होता. पण त्याचे आणि कर्णधार ग्रॅमी स्मिथचे पटत नसल्याचे वृत्त समोर आले. क्लुसनरमुळे, संघातील तरुण खेळाडूंवर वाईट प्रभाव पडत असल्याचे स्मिथने म्हटले. क्लुसरनला संघातून वगळल्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली. कसोटी संघात स्थान मिळण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर दोन्ही पक्षांनी आपले मतभेद लवकरच निकाली काढले.
वाद मिटल्यानंतरही, त्याला जास्त संधी दिल्या गेल्या नाहीत. परिणामी, श्रीलंकेविरुद्ध गाले येथे अखेरची कसोटी व २००४ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाजूला झाला. त्याच वर्षी त्याने, काउंटी क्लब नॉर्दम्पटनशायर समवेत करार केला. पुढे तो, त्याच संघासाठी चार वर्ष काउंटी क्रिकेट खेळला.
२००७ मध्ये बंडखोर इंडियन क्रिकेट लीगमध्ये (आयसीएल) क्लुसनर हा रॉयल बंगाल टायगर्स संघाचा आयकॉन खेळाडू होता. प्रशिक्षक म्हणून कारकीर्द सुरू करण्यासाठी २००९ मध्ये त्याने आयसीएलला रामराम ठोकला.
क्लुसनरने २०१० मध्ये बांगलादेशचा गोलंदाजी प्रशिक्षक, २०१२ मध्ये द. आफ्रिकेतील डॉल्फिन्स संघाचा मुख्य प्रशिक्षक तसेच २०१६ मध्ये झिंबाब्वे क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.
भारतातील टीएनपीएलमध्ये कोवई किंग्स या संघाचा देखील तो प्रशिक्षक राहिला आहे. सप्टेंबर २०१९ पासून तो अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.
हेही वाचा-
श्रीलंका पडली अफगाणिस्तानवर भारी! साखळीतील पराभवाचा बदला घेत सुपर फोरमध्ये विजयी सुरुवात
ऑसी फलंदाजांची शाळा घेत झिम्बाब्वेचा गोलंदाज बनला नंबर एक! मोडला शास्त्रींचा 31 वर्ष जुना विक्रम
टीम इंडियाची चिंता वाढली! रोहितचा हुकमी एक्का टी20 वर्ल्डकपमधून बाहेर?