भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या बहुचर्चित कसोटी मालिकेला येत्या १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत सध्याच्या काळातील अनेक अव्वल खेळाडू खेळणार आहेत. फलंदाजीत विराट कोहली, स्टीव स्मिथ, चेतेश्वर पुजारा तर गोलंदाजीत मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जसप्रीत बुमराह यासारखे खेळाडू मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
या सगळ्या खेळाडूंमध्ये वर्चस्व सिद्ध करण्यासाठी चुरशीचा सामना होणार आहे. वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने देखील त्याला कुठल्या खेळाडूचा खेळ पाहायला आवडेल, याचा खुलासा केला आहे. आपला आवडता खेळाडू म्हणून लाराने भारताचा शैलीदार फलंदाज केएल राहुलची निवड केली आहे.
राहुलचा खेळ पाहण्यासाठी एका पायावर तयार
ब्रायन लाराला भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील त्याच्या आवडत्या खेळाडूची निवड करण्यास सांगण्यात आली होती. त्यावेळी त्याने क्षणाचाही विलंब न करता केएल राहुलची निवड केली. यामागचे कारण सांगताना लारा म्हणाला, “माझ्यासाठी ही निवड करणे अगदी सोपे आहे. मी निःसंदिग्धपणे केएल राहुलची निवड करेन. राहुल एक शैलीदार फलंदाज आहे. मला नेहमीच त्याची फलंदाजी पाहण्यास आवडते. मी त्याची फलंदाजी पैसे देऊन देखील पाहण्यास तयार आहे.”
राहुलचे कौतुक करताना लारा म्हणाला, “तो ज्या पद्धतीने टी-२० सामन्यांत फलंदाजी करतो, ते अतिशय प्रेक्षणीय असते. क्रिकेटच्या या वेगवान प्रकारात देखील तो पारंपरिक पद्धतीने फटके खेळून यश मिळवितो. हे नक्कीच अवघड आहे. परंतु राहुलची फलंदाजी तंत्रशुद्ध असल्याने क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात वर्चस्व गाजवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.”
रिकी पाँटिंगनेही केली स्तुती
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने देखील लाराची री ओढत राहुलचे कौतुक केले आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यांत राहुलने केलेले प्रदर्शन निश्चितच वाखाणण्याजोगे आहे, असे पॉंटिंग म्हणाला. यंदाच्या आयपीएल हंगामातील त्याची फलंदाजी अविश्वसनीय होती, अशी पुस्तीही पाँटिंगने जोडली.
या माजी दिग्गजांनी केएल राहुलचे तोंडभरून कौतुक केले असले तरी दोन सराव सामन्यांपैकी एकाही सामन्यात भारतीय संघाने राहुलला संधी दिली नाही. त्यामुळे येत्या कसोटी मालिकेत त्याला अंतिम अकराच्या संघात स्थान मिळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
संबंधित बातम्या:
– आयसीसी टी-२० क्रमवारी जाहीर: केएल राहुल आणि विराट कोहलीची आगेकूच, पटकाविले हे स्थान
– केएल राहुलच्या शिरपेचात मानाचा तुरा; या विक्रमाच्या यादीत पटकाविले चौथे स्थान
– ब्रायन लाराने निवडले आजच्या काळातील ५ सर्वश्रेष्ठ फलंदाज आणि गोलंदाज; या दोन भारतीयांचाही समावेश