---Advertisement---

मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का मलिंगाचा आयपीएलला रामराम, नावावर आहेत एकाहून एक जबरा विक्रम 

On: गुरूवार, जानेवारी 21, 2021 2:56 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या येत्या चौदाव्या हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. नुकतीच बुधवारी (२० जानेवारी) आयपीएलच्या सर्व संघांनी कायम केलेल्या आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यानुसार आयपीएलच्या सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघाने त्यांचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा याला संघातून मुक्त केले आहे. त्यानंतर मलिंगाने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोबतच इतर सहभागी टी२० लीगलाही रामराम ठोकला आहे.

मलिंगाने फार पुर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कसोटी आणि वनडे या स्वरुपातून निवृत्ती घेतली होती. आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील फक्त टी२० क्रिकेट खेळतो. गतवर्षी त्याने श्रीलंका संघाकडून येत्या टी२० विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे पुढील टी२० विश्वचषकात खेळल्यानंतर तो या स्वरुपातून निवृत्ती जाहीर करू शकतो.

कोविड-१९ मुळे घेतला निवृत्तीचा निर्णय 

“निवृत्तीबाबत माझ्या कुटुंबियांसोबत चर्चा केली. यानंतर या निर्णयावर पोहचलो आहे. फ्रंचायजी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे. कोरोना परिस्थितीमुळे विमानप्रवासात अनेक बदल झाले आहेत. यामुळे अनेक बंधने आली आहेत. म्हणून फ्रँचायझी क्रिकेट खेळणे माझ्यासाठी अवघड झाले आहे. यामुळे मी ऑल फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या अंतिम निर्णयावर पोहचलो आहे”, असे स्पष्टीकरण मलिंगाने दिले आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाशी केली होती चर्चा

याबरोबरच पुढे बोलताना मलिंगा म्हणाला की, “मी येत्या आयपीएल हंगामाबाबत मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाशीही चर्चा केली होती. त्यांनी माझ्या निर्णयाबाबत मला पाठिंबा दिला आणि खरोखरच त्यांनी मला खूप समजून घेतले आहे. मला संधी दिल्याबद्दल अंबानी परिवाराचे मनापासून आभार. तसेच मुंबई इंडियन्स संघातील माझे सर्व सहकारी आणि माझ्या सर्व चाहत्यांचे आभार. तुम्हा सर्वांसोबतची १२ वर्षे अतिशय अप्रतिम राहिली.”

लसिथ मलिंगाचे आयपीएलमधील काही विक्रम

श्रीलंकाचा वेगवान गोलंदाज मलिंगा याने आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाकडून पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने मुंबईकडून एकूण १२२ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने १७० विकेट्स घेतल्या आहेत. यासह मलिंगा हा आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या मागोमाग अमित मिश्रा (१० विकेट्स) आणि पायूष चावला (१५६ विकेट्स) यांचा क्रमांक लागतो.

तसेच मलिंगा हा मुंबई इंडियन्स संघाकडून सर्वाधिक सामने खेळणारा चौथा खेळाडू आहे. २००९ ते २०१९ या कालावधीत मुंबईचे प्रतिनिधित्त्व करताना त्याने १२२ सामने खेळले होते. या विक्रमाच्या यादीत कायन पोलार्ड १६६ सामन्यांसह अव्वलस्थानी आहे. तर रोहित शर्मा (१५५ सामने) आणि हरभजन सिंग (१३६ सामने) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.

याव्यतिरिक्त एका सामन्यात सर्वाधिक वेळा ४ विकेट्स घेण्याचा शानदार विक्रम मलिंगाच्या नावावर आहे. आजवर सर्वाधिक ७ वेळा हा कारनामा त्याने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

इथेही पवारांचाच हात.! मुख्यमंत्र्यांना शरद पवारांचा फोन अन् टीम इंडियाचं विमान मुंबईत लँड, वाचा सविस्तर

भारतीय चाहत्यांसाठी गुडन्यूज! भारत-इंग्लंड सामन्यांसाठी ‘एवढ्या’ प्रेक्षकांना मिळू शकते स्टेडियममध्ये एन्ट्री

ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर ‘हिटमॅन’चं भारतात आगमन, फोटो तूफान व्हायरल 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---