भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला होता. हा सामना अनिर्णीत राहिला होता, तर दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या श्रेयस अय्यरला आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. तसेच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने देखील क्रमवारीत मोठी उडी घेतली आहे.
पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेपासून चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. हीच कामगिरी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये देखील सुरू ठेवली आहे. बांगलादेश संघाविरुद्ध केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे त्याला आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये मोठा फायदा झाला आहे. तो गोलंदाजांच्या यादीत ५ व्या स्थानी पोहोचला आहे.
बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तान संघ १-० च्या आघाडीवर आहे. डाव्या हाताच्या या २१ वर्षीय गोलंदाजाने चटगाव कसोटीत एकूण ५ गडी बाद केले होते. यासह त्याने क्रमवारीत इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन, कागीसो रबाडा आणि नील वॅगनर यांना मागे टाकले आहे.
श्रेयस अय्यरला झाला जबरदस्त फायदा
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. या संधीचा लाभ घेत श्रेयस अय्यरने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. पहिल्या सामन्यानंतर तो ७४ व्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर शुबमन गिल देखील ६६ व्या स्थानी पोहोचला आहे. तसेच वृद्धिमान साहा ९९ व्या स्थानी पोहोचला आहे.
तसेच रवींद्र जडेजाला देखील क्रमवारीमध्ये चांगलाच फायदा झाला आहे. तो गोलंदाजांच्या यादीत १९ व्या स्थानी पोहोचला आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तसेच आर अश्विन फलंदाजांच्या यादीत ७९ व्या स्थानी आणि अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे, तर गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन दुसऱ्या स्थानी आहे.
यासह भारतीय संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ९५ आणि ५२ धावांची खेळी करणाऱ्या टॉम लॅथमला ही मोठा फायदा झाला आहे. त्याने टॉप १० मध्ये प्रवेश केला आहे. तसेच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन गोलंदाजांच्या यादीत ९ व्या स्थानी पोहोचला आहे. तर टीम साउदी तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Photo: केएल राहुलच होणार शेट्टी कुटुंबाचा जावई? अथियासोबतची रेड कार्पेटवरील एन्ट्री ठरतेय लक्षवेधी
ऑस्ट्रेलियाला धूळ चरण्यासाठी इंग्लंडचा ‘हा’ गोलंदाज जडेजाच्या व्हिडिओ पाहून करतोय सराव