आयसीसीनं साप्ताहिक रँकिंग अपडेट जारी केलं आहे. गेल्या आठवड्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या नॉटिंगहॅम कसोटीमुळे यामध्ये काही जबरदस्त बदल झाले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावणाऱ्या हॅरी ब्रूकला मोठा फायदा झाला असून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह काही खेळाडूंचं नुकसान झालं आहे.
फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा केन विल्यमसन अजूनही पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याचे 859 रेटिंग गुण आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जो रुटला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी करून नंबर 1 फलंदाज बनण्याची संधी असेल. रुटचे 852 रेटिंग गुण असून तो विल्यमसनपेक्षा फक्त 7 अंकांनी मागे आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध 109 धावांची उत्कृष्ट खेळी खेळणारा हॅरी ब्रूक ४ स्थानांची झेप घेऊन तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र, ब्रूकच्या चढाईमुळे पाकिस्तानचा बाबर आझम, न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि भारताचा रोहित शर्मा यांना प्रत्येकी एक स्थान खाली याव लागलं. बाबर आणि मिशेल संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत. तर स्मिथ आणि रोहित अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. यशस्वी जयस्वाल आठव्या स्थानावर कायम आहे.
इंग्लंडच्या इतर फलंदाजांमध्ये बेन डकेट सहा स्थानांची झेप घेऊन 16 व्या स्थानावर पोहचला आहे. तर ऑली पोप आठ स्थानांनी पुढे सरकून 21 व्या स्थानावर गेला आहे. जॅक क्रॉलीचं मात्र नुकसान झालं. तो चार स्थानांनी घसरून 17व्या स्थानावर फेकला गेला आहे.
वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेट दोन स्थानांची झेप घेऊन 40व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी, जोशुआ दा सिल्वा 7 स्थानांच्या झेपसह 61 व्या, जेसन होल्डर 2 स्थानांची झेप घेऊन 70व्या क्रमांकावर पोहचला आहे. कावेम हॉजनं 21 स्थानांची झेप घेतली आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंडच्या ख्रिस वोक्सनं चार स्थानांच्या फायद्यासह अव्वल 20 मध्ये प्रवेश केला. तर शोएब बशीर 18 स्थानांनी पुढे सरकून 53व्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचा अल्झारी जोसेफ 2 स्थानांनी चढून 33व्या स्थानावर तर जॅडन सील्स 10 स्थानांची झेप घेऊन 34व्या स्थानावर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची हकालपट्टी, आयपीएल 2025 पूर्वी पंजाब किंग्जमध्ये होणार मोठा बदल!
आशिष नेहरा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी इच्छुक का नव्हता? समोर आलं मोठं कारण
श्रीलंका मालिकेपूर्वी संघाला धक्का, स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर