जुलै हा महिना भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खूपच खास आहे. यामागील कारण म्हणजे, भारतीय दिग्गज खेळाडूंचा या महिन्यात वाढदिवस असतो. त्यात एमएस धोनी (07), सौरव गांगुली (08) आणि सुनील गावसकर (10) यांसारख्या खेळाडूंचा समावेश होतो. नुकताच धोनी आणि गांगुलीने वाढदिवस साजरा केला. आता सुनील गावसकर 74वा वाढदिवस साजरा करत आहेत. गावसकरांची गणना जगातील दिग्गज सलामी फलंदाजांमध्ये केली जाते. गावसकरांच्या नावावर कसोटीतील सर्वात मोठा विक्रम आहे. ते कसोटीत 10000 धावा करणारे पहिले क्रिकेटपटू आहेत. त्यांनी अहमदाबाद येथे मार्च 1987मध्ये पाकिस्तानविरुद्ध हा मैलाचा दगड पार केला होता. गावसकरांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्याविषयी खास गोष्ट जाणून घेऊयात…
हेल्मेटशिवाय करायचे फलंदाजी
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीदरम्यान (1971-87) एकापेक्षा एक घातक वेगवान गोलंदाजांचा सामना केला. तसेच, त्यांच्याविरुद्ध खोऱ्याने धावाही काढल्या. ते वेस्ट इंडिजचे माल्कम मार्शल, ग्रिफीथ, अँडी रॉबर्ट्स, इंग्लंडचे इयान बॉथम, न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली, ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज डेनिस लिली आणि पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज इम्रान खान यांसारख्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध हेल्मेटशिवाय निर्भीडपणे खेळायचे. ते त्यांच्या पिढीतील एकमेव फलंदाज होते, ज्यांनी कधीच पूर्ण हेल्मेट घातले नव्हते.
हेल्मेट न घालण्यामागील कारण
‘लिटल मास्टर’ (Little Master) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावसकरांनी हेल्मेट न घालण्यामागे एक कारण होते. त्यांनी अनेकदा त्यांच्या मुलाखतीत याचा उल्लेख केला आहे. गावसकर सन 2009मध्ये एका मुलाखतीत म्हणाले होते की, त्यांना रात्री झोपण्यापूर्वी वाचण्याची सवय राहिली आहे. अधिकतर ते वाचता-वाचताच झोपायचे. त्यामुळे त्यांच्या मानेच्या मांसपेशी कमजोर झाल्या होत्या आणि त्यांना भीती होती की, जर त्यांनी हेल्मेट घालून खेळले, तर ते उसळी चेंडू खेळू शकणार नाहीत.
स्वत: बनवले होते डोक्याचे कवच
मात्र, एक वेळ अशीही आली, जेव्हा त्यांना डोक्यावर सुरक्षा कवच घातल्याचे पाहिले गेले होते. वेस्ट इंडिजचे वेगवान गोलंदाज माल्कम मार्शल यांचा वेगवान चेंडू त्यांच्या डोक्यावर लागला होता. त्यानंतर गावसकरांनी आपल्या डोक्यासाठी स्वत:च सुरक्षा कवच तयार केला होता. हेच कवच घालून ते आपल्या क्रिकेट कारकीर्दीची अखेरची काही वर्षे खेळले होते.
गावसकरांची कसोटी कारकीर्द
गावसकरांच्या कसोटी कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्यांनी 125 कसोटी सामन्यांतील 214 डावांमध्ये 51.12च्या सरासरीने 10122 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्यांनी 34 शतक आणि 45 अर्धशतकेही झळकावली आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी कसोटीत 4 वेळा द्विशतक ठोकले आहे. नाबाद 236 ही त्यांची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. (legend cricketer sunil gavaskar never use helmet during playing cricket match know why)
महत्वाच्या बातम्या-
हेडिंग्ले कसोटीत पडला विक्रमांचा पाऊस, ‘हे’ 4 रेकॉर्ड प्रत्येक क्रिकेटप्रेमीने वाचलेच पाहिजेत
“कॅलिसच क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन महान खेळाडू”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले कौतुक