भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने ज्यावेळी कर्णधारपद सोडले, तेव्हा रोहित शर्मा याच्या खांद्यावर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आली. यावेळी भारतीय क्रिकेटप्रेमींसोबतच संघालाही धोनीकडून आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची आशा होती. यामध्ये महान फलंदाज सुनील गावसकर यांच्या नावाचाही समावेश होता. मात्र, भारताने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा किताब गमावला आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही पराभव पत्करला, तेव्हा लिटल मास्टर गावसकर रोहितवर नाराज झाले. यावेळी त्यांनी प्रशिक्षण विभागातील राहुल द्रविड, विक्रम राठोड आणि पारस म्हांब्रे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
काय म्हणाले गावसकर?
सोमवारी (दि. 10 जुलै) 74वा वाढदिवस साजरा करणारे सुनील गावसकर (Sunil Gavaskar) माध्यमांशी संवाद साधताना रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याविषयी बोलले. ते म्हणाले की, “मला त्याच्याकडून जास्त अपेक्षा होती. भारतात खेळतानाची गोष्ट वेगळी असते, पण जेव्हा तुम्ही परदेशात चांगली कामगिरी करता, ती खरी कसोटी असते. तिथेच त्याचे प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. एवढंच नाही, तर टी20 क्रिकेट प्रकारातही, आयपीएलचे अनेक अनुभव, कर्णधाराच्या रूपात शंभरहून अधिक सामने खेळूनही, सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंचा सहभाग असूनसुद्धा अंतिम सामन्यात न पोहोचणे निराशाजनक राहिले.”
यावेळी त्यांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, निवडकर्ते आणि बीसीसीआयकडून भारताच्या पराभवाची योग्य समीक्षा करण्यात आली होती का? तसेच, मागील महिन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाविषयीही गावसकर बोलले. ते म्हणाले की, प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधाराला डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात घेतलेल्या निर्णयांविषयी विचारले पाहिजे होते की, प्रत्येक निर्णयामागे त्यांचा काय विचार होता.
गावसकर म्हणाले की, “त्यांना विचारले पाहिजे होते की, ‘तुम्ही आधी क्षेत्ररक्षण का केले?’ ठीक आहे, नाणेफेकीवेळी सांगण्यात आले होते की, ढगाळ वातावरण होते. यानंतर असा प्रश्न विचारला पाहिजे की, ‘तुम्हाला आखुड टप्प्याच्या चेंडूविरुद्ध ट्रेविस हेडची कमजोरी माहिती नव्हती का?’ उसळी चेंडूंचा वापर त्यावेळी का केला, जेव्हा धावसंख्या 80 झाली होती. तुम्हाला माहितीये, जेव्हा हेड फलंदाजीला आला, समालोचन बॉक्समध्ये बसलेला रिकी पाँटिंग म्हणत होता, ‘त्याला उसळी चेंडू टाका, उसळी चेंडू टाका.’ प्रत्येकाला याविषयी माहिती होते, पण आपण प्रयत्नच केला नाही.”
विशेष म्हणजे, डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यात पराभूत झाल्यानंतर रोहित शर्मा याच्या नेतृत्वावर जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच, त्याच्या तयारीवरही प्रश्न उपस्थित झाले होते. तो म्हणाला होता की, एका संघाला अशा मोठ्या सामन्यांसाठी कमीत कमी 20 दिवसांच्या तयारीची गरज असते. मात्र, यावरही गावसकर चांगलेच बरसले.
रोहितच्या या वक्तव्याशी गावसकरांनी असहमती दर्शवली. ते म्हणाले की, “आपण कोणत्या तयारीविषयी बोलत आहोत? आता ते वेस्ट इंडिजमध्ये आहेत. तुमच्यासमोर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे उदाहरण आहे. तुम्ही तिथे कोणता सामना खेळत आहात का? तेव्हा हे 20-25 दिवसाचं काय आहे? जेव्हा तुम्ही तयारीविषयी बोलता, तेव्हा याबाबत वास्तविक राहा. 15 दिवसांआधी जाऊन दोन सराव सामने खेळले. मुख्य खेळाडू विश्रांती करू शकतात, पण सीमांत (Marginal Player) खेळाडूही त्यांना आव्हान देऊ शकतात, जे चांगले प्रदर्शन करत नाहीयेत.”
गावसकरांनी रोहित शर्मा आणि प्रशिक्षण विभागावर उपस्थित केलेले प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून तिथे त्यांना 2 कसोटी सामने, 3 वनडे सामने आणि 5 टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. अशात 12 जुलैपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघ कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. (legend sunil gavaskar furious over skipper rohit sharma captaincy read here)
महत्वाच्या बातम्या-
घातक वेगवान गोलंदाजांविरुद्ध हेल्मेटशिवाय का खेळायचे गावसकर? ‘हे’ होतं कारण
हेडिंग्ले कसोटीत पडला विक्रमांचा पाऊस, ‘हे’ 4 रेकॉर्ड प्रत्येक क्रिकेटप्रेमीने वाचलेच पाहिजेत