सुमारे तीन वर्षांपूर्वी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशन (सीएबी) च्या आगामी निवडणुकीत अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.
गांगुली (52 वर्षे) 2019 पर्यंत सीएबी अध्यक्ष होते. त्यांनी 2014 मध्ये दिवंगत जगमोहन दालमिया यांच्या नेतृत्वाखाली राज्य युनिटचे सचिव म्हणून आपला कार्यकाळ सुरू केला. त्यानंतर 2019 मध्ये, त्यांची एकमताने बीसीसीआय अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि जय शाह सचिव झाले, परंतु एक कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर, गांगुलीची जागा 1983 च्या विश्वचषकाचा हिरो रॉजर बिन्नीने घेतली.
राज्य युनिटमधील घडामोडींची माहिती असलेल्या सीएबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मीडीयाशी बोलताना सांगितले की, “हो, सौरव व्यवस्थापन व्यवस्थेत परतण्यास उत्सुक आहे. त्याने सीएबी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या घटनेनुसार, त्याच्याकडे पाच वर्षे शिल्लक आहेत (राज्य संघटनेत एकूण नऊ वर्षे). तो एकमताने निवडला जाईल की निवडणुका होतील हे अद्याप स्पष्ट नाही.”
सध्याचे सीएबी अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली हे सौरवचे मोठे भाऊ आहेत. ते सहा वर्षे पूर्ण करतील त्यानंतर लोढा समितीने शिफारस केलेल्या घटनेनुसार त्यांना अनिवार्य विश्रांती घ्यावी लागेल.
या घडामोडीमुळे बंगाल क्रिकेटमध्ये नवचैतन्याची चाहूल लागली आहे. गांगुलीच्या पुनरागमनाची चाहुल लागताच, मैदानाबाहेरही उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे. अनेक युवा क्रिकेटपटूंना गांगुलीसारख्या अनुभवी नेतृत्वाकडून मार्गदर्शन मिळण्याची आशा आहे. “दादा” पुन्हा एकदा आपल्या जुन्या भूमिकेत येताना दिसणार की काय, अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. त्याच्या नेतृत्त्वात बंगाल क्रिकेटला नव्या युगाची दिशा मिळेल, असा विश्वास अनेक माजी खेळाडू आणि चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.






