सध्या ओमानमध्ये लिजेंड्स लीग क्रिकेट खेळली (legends league cricket) जात आहे. या लीगमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. शनिवारी (२२ जानेवारी) इंडिया महाराजा आणि वर्ल्ड जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात नमन ओझा (naman ojha) याने तुफानी खेळी केली. इंडिया महाराजासाठी खेळताना माजी भारतीय खेळाडू ओझाने ६९ चेंडूत १४० धावा ठोकल्या. यामध्ये त्याच्या १५ चौकार आणि नऊ षटकारांचा समावेश होता. हे या स्पर्धेतील पहिलेच शतक ठरले.
ओझाने या सामन्यात फलंदाजी करताना अवघ्या ५७ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याच्या या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर इंडिया महाराजा संघाने मर्यादित २० षटकांमध्ये २०९ धावा ठोकल्या. असे असले तरी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंडिया महाराजा संघाची सुरुवात काही खास झाली नव्हती. संघाने १५ धावांवर त्यांच्या दोन महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या.
प्रथम फलंदाजी करताना सुब्रमण्यम बद्रीनाथ आणि वसीम जाफर यांनी स्वस्तात विकेट गमावल्या. त्यानंतर कर्णधार मोहम्मद कैफ आणि नमन ओझाने तिसऱ्या विकेटसाठी १८७ धावांची महत्वपूर्ण भागीदारी पार पाडली. त्याच्या या भागीदारीने सामन्याचा चित्र पालटले. मोहम्मद कैफने सामन्यात ४७ चेंडू खेळले आणि यामध्ये ५३ धावा केल्या. यादरम्यान कैफने तीन षटकार आणि एक चौकार मारला.
तत्पूर्वी, इंडिया महाराज संघाचे लिजेंड्स क्रिकेट लीगमधील प्रदर्शन आतापर्यंत आप्रतिम राहिले आहे. लीगमधील पहिल्या सामन्यात इंडिया महाराजा संघाने एशिया लायन्स संघाला सहा विकेट्सने मात दिली होती. या पहिल्या सामन्यात भारताचा माजी दिग्गज यूसुफ पठाणने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. यूसुफने या सामन्यात ४० चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८० धावांचा टप्पा गाठला होता.
दरम्यान, लीगमधील या दुसऱ्या सामन्यात महत्वाची खेळी करणाऱ्या नमन ओझाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर ती खूप छोटी आहे. ओझाने भारतीय संघासाठी एक कसोटी सामना, एक एकदिवसीय सामना आणि दोन टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
राज बावाने तोडला धवनचा १८ वर्ष जुना विश्वविक्रम! युवराजशी आहे खास नाते
प्रजासत्ताक दिनी ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा असणार खास आकर्षण; हरियाणा सरकारने घेतलाय ‘हा’ निर्णय
लिलावात सहभागी होण्यापूर्वीच चेन्नईला मोठा धक्का; ज्याच्यावर होती नजर, त्याचीच लिलावातून माघार
व्हिडिओ पाहा –






