ला लीगच्या नवीन मोसमाची सुरुवात एकदम थाटात झाली आहे. या नवीन मोसमात बार्सेलोना संघाचा तिसरा सामना शनिवारी मध्यरात्री इस्पानियाल या संघाशी झाला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बार्सेलोना संघाने हा सामना ५-० अश्या गोल फरकाने जिंकला. बार्सेलोनाकडून आघाडीचा खेळाडू लियोनेल मेस्सीने गोलची हॅट्रीक नोंदवली. त्याच बरोबर जेराड पिके आणि लुईस सुआरेझ यांनी एक-एक गोल नोंदवला.
सामन्यात पहिल्या सत्रापासूनच बार्सेलोना संघाचा दबदबा राहीला. १८ व्या मिनिटाला बार्सेलोना संघाला फ्री किक मिळाली. याचा फायदा सुआरेझला उठावात आला नाही. त्याने केलेली किक इस्पानियालच्या गोलकीपर पाउल लोपेझने रोखली. सामन्यात २५ व्या मिनिटाला बार्सेलोना संघाने चाल रचली. रॅकिटीकने बॉल बॉक्समध्ये असणाऱ्या मेस्सीकडे पास केला. याचा फायदा उचलत मेस्सीने दोन डिफेंडर्सला चुकवत बॉल गोल जाळ्याच्या उजव्या कोपऱ्यात मारला आणि बार्सेलोनाचा पहिला गोल नोंदवला. बार्सेलोना संघाने सामन्यात १-० अशी आघाडी मिळवली.
त्यानंतर सामन्यातील दुसरा गोल होण्यासाठी खूप वेळ लागला नाही. मेस्सी आणि जोर्डी अलबाने लेफ्ट विंगच्या बाजूने चाल रचली. त्याने सेंटर फरवर्डच्या जागी असणाऱ्या मेस्सीला बॉल पास केला पण चार खेळाडूंना चकवताना मेस्सी अपयशी ठरला. त्याचाकडून बॉल इस्पानियालच्या डिफेंडरच्या पायाला लागून परत जोर्डी अलाबाकडे गेला. त्याने बॉल इन केला त्यावर मेस्सीने बॉलला हलकेसे डिफ्लेक्शन देत दुसरा गोल नोंदवला. बार्सेलोना संघाने ३४व्या मिनिटाला २-० अशी आघाडी घेतली. पहिले सत्र संपले त्यावेळी बार्सेलोना २-० अशी आघाडीवर होती.
दुसर्या सत्रात सुरुवातीला सामन्याच्या ४७ व्या मिनिटाला बार्सेलोना संघाने राइट विंग कडून उत्तम चाल रचली. या चालीचे ते गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरले. काही सेकंदाच्या अंतरात सुआरेझने गोल करण्याच्या दोन सलग संधी गमावल्या. ५४ व्य मिनिटाला रॅकिटीक आणि मेस्सीने उत्तम पासिंग खेळाचे उदाहरण देत सुआरेझ साठी गोलची संधी निर्माण केली. ही संधी गोल समोर उभ्या असणाऱ्या सुआरेझने गमावली.६६ व्या मिनिटाला मेस्सीने गोल करत स्वतःची हॅट्रिक पूर्ण केले तर बार्सेलोना संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली.
सामन्यातील चौथा गोल बार्सेलोनाने कॉर्नरचा फायदा उचलत केला. बार्सेलोनाचा डिफेंडर जेराड पिकेने हेडर द्वारे हा ८६ व्या मिनिटाला हा गोल केला. बार्सेलोना संघासाठी बदली खेळाडू म्हणून आलेला आणि आपला पहिला सामना खेळणाऱ्या डोम्बालेने त्याला सुरेख पास दिल. या संधीचा पुरेपूर फायदा घेत ९० व्या मिनिटाला लुईस सुआरेझने बार्सेलोना संघाचा पाचवा गोल केला. बार्सेलोना संघाने हा सामना ५-० अश्या मोठ्या गोलफरकाने जिंकला.
या सामन्यातील बार्सेलोना संघाची कामगिरी एकदम सुरेख झाली. यामुळे या संघाचे पाठीराखे खूप आनंदी दिसले. हा सामना प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरला. या विजयासह बार्सेलोना संघ ला लीगामध्ये पहिल्या स्थानावर विराजमान झाला. सलग तीन सामन्यात बार्सेलोना संघाने तीन विजय मिळवले आहेत.
जर तुम्हांला माहिती नसेल तर-
बार्सेलोना संघ या तीन सामन्यात तीन विजयासह नऊ गुणांची कमाई करत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. बार्सेलोनाचा मुख्य प्रतिस्पर्धी संघ रियाल माद्रिद तीन सामन्यात एक विजय आणि दोन सामने बरोबरीत सोडवल्याने ५ गुणांची कमाई करत पाचव्या स्थानावर आहे.
मेस्सीने लागवलेली हॅट्रीक या मोसमातील पहिली हॅट्ट्रिक ठरली आहे. तीन सामन्यात खेळताना मेस्सीने ५ गोल नोंदवले आहेत. विशेष बाब म्हणजे पहिल्या सामन्यात तीन वेळेस त्याने मारलेला बॉल गोल पोस्टला लागला होता. पण पहिल्या सामन्यात त्याला गोल करण्यात अपयश आले होते.